नागपुरात महिला कार चालकाने सायकलस्वारास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:33 AM2018-05-22T01:33:07+5:302018-05-22T01:33:19+5:30
एका कार चालक महिला इंजिनियरने सायकलस्वारास चिरडले. हा अपघात रविवारी रात्री वर्धा रोडवरील नीरी गेटसमोर घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका कार चालक महिला इंजिनियरने सायकलस्वारास चिरडले. हा अपघात रविवारी रात्री वर्धा रोडवरील नीरी गेटसमोर घडला. हरिभाऊ सीताराम भोयर (५५) रा. वाठोडा मेहरनगर असे मृताचे नाव आहे. हरिभाऊ हे सायकलने जात असताना नीरी गेटसमोर वॅगनआर गाडी (एमएच/४९/एई/१५४२)च्या चालक प्रियंका गौतम मुकुंदे (२६) यांनी सायकलला जोरदार धडक दिली. भोयर जखमी झाले. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. प्रियंका या रेल्वेत अभियंता आहेत. बजाजनगर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महिलेचा मृत्यू, पती जखमी
बाईक स्लीप झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला तर पती जखमी झाला. जिजामातानगर उमरेड रोड येथील रहिवासी ४६ वर्षीय रत्नमाला मुकुंद खोब्रागडे या पतीसोबत रविवारी दुपारी बाईकने जात होत्या. बाईक स्लीप झाल्याने दोघेही जखमी झाले. रुग्णालयात नेल्यावर रत्नमाला यांचा मृत्यू झाला. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
जुन्या वादातून युवकावर हल्ला
नागपूर : अजनी येथे जुन्या वादातून एका युवकावर खुनीहल्ला करण्यात आला. रविवारी रात्री १२.३० वाजता सिद्धार्थनगर हावरापेठ येथील रहिवासी २४ वर्षीय जितेंद्र हिरामण हिवरकर याच्यावर पाच ते सहा युवकांनी तलवारीने हल्ला केला. सिल्व्हर रंगाच्या चारचाकी वाहनात आलेल्या युवकांनी हा हल्ला केला. यात जितेंद्र गंभीर जखमी झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.