नागपुरात काजू स्वस्त, बदाम, आक्रोड व खारीक महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 09:11 PM2019-08-22T21:11:12+5:302019-08-22T21:14:17+5:30
गेल्या काही दिवसापासून किमतीत वाढ झाल्यामुळे सुकामेव्याची खरेदी गरीब आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. जीएसटीचा किमतीवर परिणाम झाला आहे. तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी भाव दुपटीवर गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुभेच्छांसोबत सुदृढ आरोग्यासाठी सुकामेवा (ड्रायफ्रूट) देण्याचा ट्रेंड हिट ठरला आहे. प्रत्येक समारंभ आणि भेटस्वरुपात देण्यासाठी सुकामेव्याची मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसापासून किमतीत वाढ झाल्यामुळे सुकामेव्याची खरेदी गरीब आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. जीएसटीचा किमतीवर परिणाम झाला आहे. तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी भाव दुपटीवर गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
इतवारा किराणा असोसिएशनचे अध्यक्ष भंवरलाल जैन म्हणाले, भारत सरकारने खारीकवर २०० टक्के आयात शुल्क लावल्यामुळे पाकिस्तानातून आवक बंद झाली आहे. याशिवाय देशांतर्गत उत्पादक कमी असल्यामुळे ठोक बाजारात भाव १२० रुपयांवरून २८० रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळमध्ये जास्त भावात विक्री होत असून सध्या भाव कमी होण्याची काहीही शक्यता नाही. याशिवाय बदाम ६६० रुपयांवरून ७१० रुपयांपर्यंत (किलो) वाढ झाली आहे. बदाम कॅलिफोर्निया (अमेरिका) येथून आयात होते. नवीन उत्पादन येण्यास उशीर असल्यामुळे भाव कमी होण्याची शक्यता नाही. अक्रोडच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. चिली आणि कॅलिफोर्निया येथून आवक कमी आहे. गेल्यावर्षीच्या ४०० रुपयांच्या तुलनेत भाव ६५० रुपयांपर्यंत वाढले आहेत.
सध्या औषध म्हणून काजूला मागणी वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत भाव कमी आहेत. इतवारी बाजारात ३२० नंबर काजूचे भाव गेल्यावर्षी ७८० रुपयांच्या तुलनेत ६९० रुपये आणि २४० नंबर काजू गेल्यावर्षीच्या ९०० रुपयांच्या तुलनेत ८०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. बाजारात काजूची आवक कोकण, ओरिसा, दक्षिण अफ्रिका आणि बहरीन देशातून होते. यंदा आवक चांगली आहे. किसमीस गेल्यावर्षीच्या २७० रुपयांच्या तुलनेत भाव २२० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. सध्या बदामवर १२ टक्के जीएसटी, खारीक १२ टक्के, काजू ५ टक्के, अक्रोड ५ टक्के, किसमिस ५ टक्के आणि विलायचीवर ५ टक्के जीएसटी आहे.
विलायचीत १६०० रुपयांची घसरण
ठोक बाजारात दीड वर्षांपूर्वी एक हजार रुपये आणि सहा महिन्यांपूर्वी विलायचीचे भाव २ हजार रुपये किलो होते. त्यानंतर भाव निरंतर वाढत ५ हजार रुपयांवर पोहोचले. त्यामुळे विक्रीत प्रचंड घसरण झाली. पण १५ दिवसांपूर्वी भाव १६०० रुपयांनी अचानक कोसळून ३४०० रुपयांपर्यंत खाली आले. आवक केरळ आणि तामिळनाडू येथून होते. या ठिकाणी विलायची बोर्डातर्फे लिलाव करण्यात येतो. खाकसची किंमत ५०० रुपयांवरून एक हजारापर्यंत वाढल्याचे जैन यांनी सांगितले.