नागपूर मध्यवर्ती कारागृह लॉकडाऊन : टीम ‘बी’ बाहेर; टीम ‘ए’ आत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 09:23 PM2020-06-12T21:23:16+5:302020-06-12T21:26:09+5:30

पहिल्या टप्प्यात टीम ए बाहेर आल्यानंतर टीम बी आतमध्ये गेली. आता २१ दिवसांनी ती टीमही बाहेर येताच आता दुसऱ्या टप्प्यात १०७ अधिकारी - कर्मचाऱ्यांची टीम ए कारागृहात ‘लॉकडाऊन’ झाली.

Nagpur Central Jail Lockdown: Team 'B' out; Inside Team A! | नागपूर मध्यवर्ती कारागृह लॉकडाऊन : टीम ‘बी’ बाहेर; टीम ‘ए’ आत!

नागपूर मध्यवर्ती कारागृह लॉकडाऊन : टीम ‘बी’ बाहेर; टीम ‘ए’ आत!

googlenewsNext
ठळक मुद्देदुसऱ्या टप्प्यात १०७ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आता जबाबदारी

गणेश खवसे/लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृह हे गेल्या १ मेपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आहे. त्यामुळे आतमध्ये तर कुणी जाऊच शकत नाही. मात्र आतमध्ये असलेल्यांना बाहेरची ‘एंट्री’ बंद होती. टीम ए आणि टीम बी अशी वर्गवारी करून २१ - २१ दिवसांचा कालावधी त्यांच्यासाठी निश्चित करून व्यवस्थापन आणि सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात टीम ए बाहेर आल्यानंतर टीम बी आतमध्ये गेली. आता २१ दिवसांनी ती टीमही बाहेर येताच आता दुसऱ्या टप्प्यात १०७ अधिकारी - कर्मचाऱ्यांची टीम ए कारागृहात ‘लॉकडाऊन’ झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच अर्थात कारागृह लॉकडाऊन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार १ मेपासून नागपुरातील मध्यवर्ती कारागृह ‘लॉकडाऊन’ करण्यासाठी कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी ‘प्लान’ तयार केला. त्यानुसार १०२ अधिकारी - कर्मचाऱ्यांची पहिली टीम ए तर १०५ जणांची टीम बी तयार करण्यात आली. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यापैकी टीम ए मधील अधिकारी - कर्मचारी १ मे रोजी कारागृहात ‘लॉकडाऊन’ झाले. यामध्ये स्वत: कारागृह अधीक्षक कुमरे हेसुद्धा सहभागी होते. २१ दिवस टीम ए पूर्णत: लॉकडाऊन होती. त्यानुसार २१ मे रोजी टीम ए बाहेर येण्यापूर्वीच टीम बी तैनात होती. टीम बीनेसुद्धा आपल्यावर दिलेली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडली. ही टीम गुरुवारी बाहेर येताच त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आता टीम ए कारागृहात बंदिस्त झाली. पुढील आदेशापर्यंत ही टीम कार्य करणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कारागृह लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार  कैद्यांसोबतच आतमध्ये गेलेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचे त्यांचे खाणेपिणे, औषधोपचार सर्व आतमध्ये केला जात आहे. नागपूर कारागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. कैद्यांनाही मास्क, सॅनिटायझर दिले जात आहे. कैद्यांची नियमित तपासणी, त्याची निगराणी यासह सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे कारागृह अधीक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पुढील निर्देशापर्यंत कार्य असेच सुरू राहणार
शासनाच्या निर्देशानुसार नागपूर कारागृहातील चोख व्यवस्था पार पाडली जात आहे. कारागृह लॉकडाऊन करण्यासंदर्भात दोन टीम तयार करण्यात येऊन २१ - २१ दिवसांची जबाबदारी या टीमवर देण्यात आली. पहिल्या टप्प्यात टीम ए आणि टीम बीसुद्धा आतमध्ये लॉकडाऊन होती. आता दुसऱ्यां टप्प्याला सुरुवात झाली आहे. शासनाच्या पुढील निर्देश येत नाही, तोपर्यंत जबाबदारी याचप्रकारे पार पाडली जाईल.
- अनुपकुमार कुमरे,
कारागृह अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह नागपूर

मास्क बनविण्यावर भर
नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातील कारखान्यात कैद्यांकडून मास्क तयार करण्याचे काम केले जात आहे. अख्ख्या विदर्भातीलच कारागृहांकडून मास्कची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत साधारणत: ८० हजारांच्या आसपास मास्क तयार करण्यात येऊन ते नागपुरातील ३०-३५ शासकीय -निमशासकीय कार्यालयासोबतच विदर्भातील संबंधितापर्यंत मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात आला. त्या माध्यमातून नागपूर कारागृहाला ८ लाखाचे उत्पन्न झाले. हे कार्य अविरतपणे सुरू राहील, असे कुमरे यांनी सांगितले.

आतापर्यंत ७२० कैदी आले बाहेर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या गुन्ह्यात सात वर्षांपर्यंत शिक्षा झाली किंवा होऊ शकते, अशा गुन्ह्यातील आरोपींना जामिनावर बाहेर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार नागपूर कारागृहातून एकूण ७२० कैदी बाहेर आले. २०० कैद्यांना अंतरिम जामीन (२ महिला कैदी), २७० नियमित जामीन (१७ महिला) देण्यात आला. यासोबतच अभिवचन रजा १, संचित रजा ४, कोरोना आकस्मिक रजा २४३ (८ महिला) आणि मार्गस्थ अशा २५० अशा एकूण ७२० कैद्यांना कारागृहातून बाहेर पडता आले.

Web Title: Nagpur Central Jail Lockdown: Team 'B' out; Inside Team A!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.