राज्यात १० ठिकाणी होणार खनिज सर्वेक्षण नागपूर, चंद्रपूर व यवतमाळचा समावेश :
By admin | Published: May 12, 2016 02:58 AM2016-05-12T02:58:07+5:302016-05-12T02:58:07+5:30
भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाद्वारे २०१६-१७ मध्ये खनिज सर्वेक्षण समन्वेषणाच्या एकूण १० योजना राज्यामध्ये राबविण्याचे प्रस्तावित केले आहे.
महाराष्ट्र राज्य भूवैज्ञानीय कार्यक्रम मंडळाची बैठक
नागपूर : भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाद्वारे २०१६-१७ मध्ये खनिज सर्वेक्षण समन्वेषणाच्या एकूण १० योजना राज्यामध्ये राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात चुनखडक, चंद्रपूर जिल्हा लोह खनिजासाठी, अहमदनगर, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील सामान्य सर्वेक्षण योजनांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य भूवैज्ञानीय कार्यक्रम मंडळाची ५२ वी बैठक नागपूर येथे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय व केंद्र शासनाच्या भारतीय भूवैज्ञानीय सर्वेक्षण विभाग व इतर यंत्रणेद्वारे कार्यसत्र २०१५-१६ मध्ये महाराष्ट्र राज्यात केलेल्या भूवैज्ञानीय सर्वेक्षण व खनिज समन्वेषण कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच २०१६-१७ मध्ये संबंधित विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या भूवैज्ञानीय कार्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला भूविज्ञान आणि खनिकर्म विभागाचे, संचालक रा. शि. कळमकर, महाराष्ट्र सुदूर केंद्राचे डॉ. सुब्रतो दास, भारतीय भूवैज्ञानीय सर्वेक्षण विभागाचे चौधरी, नितनवरे, भारतीय खाण ब्यूरोचे ओ. पी. गोपाल. सी. एम. पी. डी. आयचे रेड्डी, राव, वेस्टर्न कोल फिल्डचे डॉ. रैना, मिनरल एक्स्फ्लोरेशन कॉपोर्रेशनचे शर्मा, मॅगनीज ओअर इंडिया लि. चे सरकार इत्यादी केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
राज्य शासनाने खाणी व पूर्वेक्षणाच्या कामास प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यावेळी खाण व खनिजे (विकसन व नियमन) अधिनियम २०१५ च्या अनुषंगाने झालेल्या सुधारणांची माहिती देण्यात आली. खाण ब्लॉक लिलाव प्रक्रियेच्या परिस्थितीत बदल करून, अनुकूल बनवून उद्योजकांचा संभ्रम दूर केला.
शासन खाण व पूर्वेक्षण कार्यास गती प्रदान करून जास्तीत जास्त खनिज क्षेत्रे लिलावाकरिता उपलब्ध करण्यासाठी कार्यरत आहे. या कामासाठी त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विभागाद्वारे केलेल्या पूर्वेक्षणाच्या कामाची प्रशंसा करून जास्तीत जास्त खनिज क्षेत्रे अल्प कालावधीत लिलावासाठी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.
भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाद्वारे महाराष्ट्र राज्यात करण्यात आलेल्या खनिज सर्वेक्षण व समन्वेषण कार्याचा आढावा विशद करताना कार्यसत्र २०१६-१७ मध्ये संचालनालयाद्वारे करण्यात आलेल्या भूवैज्ञानीय कार्याची निष्पत्ती चुनखडक व होल खनिजाच्या लिलावाचे दृष्टीने राज्यात चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये सिद्ध करण्यात आली आहे.
भारतीय भूवैज्ञानीय सर्वेक्षण व इतर केंद्र शासनाचे विभागाद्वारे कार्यसत्र २०१५-१६ मध्ये राज्यातील विविध भागात खनिजांकरिता भूवैज्ञानीय सर्वेक्षण करण्यात आले. या कामांच्या फलश्रुतीबाबत माहिती संबंधित विभागांनी या बैठकीत सादर केली. तसेच वर्षसत्र २०१६-१७ मध्ये भारतीय भूवैज्ञानीय सर्वेक्षण व इतर विभागाद्वारे राज्यात विविध खनिजांकरिता भूवैज्ञानीय सर्वेक्षण व पूर्वेक्षणाची प्रस्तावित कामांची माहितीही यावेळी देण्यात आली.(प्रतिनिधी)