उत्तर नागपूरचा लुक बदलतोय !

By admin | Published: July 17, 2016 01:35 AM2016-07-17T01:35:15+5:302016-07-17T01:35:15+5:30

वर्धा रोड शहराची शान आहे. उपराजधानीला स्मार्ट सिटी करण्याचा संकल्प महापालिका आणि राज्य सरकारने केला आहे.

Nagpur is changing the look of Nagpur! | उत्तर नागपूरचा लुक बदलतोय !

उत्तर नागपूरचा लुक बदलतोय !

Next

उड्डाण पूल, सिमेंट रस्ते व मेट्रो सुविधा लवकरच : स्मार्ट सिटीकडे वाटचाल
नागपूर : वर्धा रोड शहराची शान आहे. उपराजधानीला स्मार्ट सिटी करण्याचा संकल्प महापालिका आणि राज्य सरकारने केला आहे. त्यामुळे शहरातील महत्त्वाचा घटक असलेल्या कामठी परिसराचा सर्वांगिण विकास केला जात आहे. कामठी रोडच्या विकासामुळे उत्तर नागपूरही स्मार्ट होत आहे.
झिरो माईलपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरील उत्तर नागपूर भागाचा विस्तार झाला आहे. येथून रेल्वे स्टेशन, विमानतळ जवळ आहे. मानकापूर उड्डाण पूल, चौपदरी महामार्गासोबतच वीज, पाणी व रस्ते अशा स्वरूपाच्या मूलभूत सुविधांची कामे झपाट्याने सुरू आहेत. काही भागात अद्याप मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यातरी सुरू असलेल्या व प्रस्तावित विकास प्रकल्पामुळे त्या उपलब्ध होणार असल्याने या भागाचा चेहरामोहरा बदलणार आहे.
शहरात स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु जमिनीच्या वाढलेल्या किमतीमुळे शहरात घर खरेदी करणे सर्वांना शक्य होत नाही. नागपूर शहरातील जमिनीचे भाव गेल्या काही वर्षात आकाशाला भिडलेले आहेत. परंतु लोकांचे दुर्लक्ष असलेल्या व मध्यमवर्गीयांना परवडेल अशा भावात आजही उत्तर नागपुरात जमीन उपलब्ध आहे. तसेच सुरू असलेल्या व प्रस्तावित विकास प्रकल्पामुळे या भागाने विकासाच्या दिशेने झेप घेतली आहे.
शहरात वर्धा रोड, मिहान परिसराच्या विकासाची चर्चा असते. परंतु येत्या काही वर्षात उत्तर नागपूरचाही सर्वांगीण विकास झालेला बघायला मिळणार आहे. या भागात उड्डाण पूल, मेट्रो रेल्वे, चौपदरी सिमेंट -क्रॉंक्र ीट महामार्ग, कॅन्सर हॉस्पिटल, उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्था प्रस्तावित आहेत. खनिकर्म, वेकोली, पॉवरग्रीड अशा मोठ्या कंपन्या या भागात आहेत. विभागीय क्रीडा भवन, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी अशा स्वरूपाच्या राष्ट्रीय स्तरावरील संस्था उत्तर नागपुरात आहेत. भविष्यात या भागाचा झपाट्याने विकास होणार आहे.(प्रतिनिधी)

मध्यमवर्गीयांना गुंतवणुकीची संधी
शहरातील जमिनीच्या किमती आवाक्याबाहेर असल्याने मध्यमवर्गीय शहराबाहेर मेट्रोरिजन क्षेत्रात जमीन खरेदी करीत आहेत. वास्तविक झिरोमाईलपासून उत्तर नागपूरचे अंतर केवळ आठ किलोमीटर आहे. या भागात जमिनीचे भाव ३००० ते ४५०० रुपये प्रति चौरस फूट आहेत. तेच वर्धा मार्गावर जमिनीचे भाव ८ ते १० हजार रुपये प्रति चौरस फूट आहेत. मेट्रोरिजन क्षेत्रात घर खरेदी करावयाचे झाल्यास येथे वीज, पाणी व रस्ते अशा समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र उत्तर नागपुरात २४ तास पाणी व वीज तसेच सिमेंट रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना शहरातच घर बांधावयाचे असल्यास कमी किमतीचा उत्तर नागपूर हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.


चांगल्या दर्जाच्या शिक्षण संस्था
कुणालाही आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता असते. त्यामुळे ज्या भागात चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक संस्था आहेत त्या परिसरात नवीन वसाहती निर्माण होतात. उत्तर नागपुरात दिल्ली पब्लिक स्कूल, (डीपीएस), इडिफाय, सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूल, माऊं ट लिट्रा, अशा स्वरूपाच्या नामांकित शाळा आहेत. तसेच या भागात अनेक शैक्षणिक संस्था प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे उत्तर नागपुरात चांगल्या दर्जाची रुग्णालये, महाविद्यालये, बँका, बाजार, बस स्थानक व रेल्वे स्टेशन नजिकच आहेत.
मोठ्या कंपन्यांची भरमार
ज्या भागात कारखाने असतात त्या भागाचा झपाट्याने विकास होतो. उत्तर नागपुरात पॉवरग्रीड, मॉयल, वेकोली अशा संस्थांची कार्यालये आहेत. वेकोलीचे आपत्ती निवारण केंद्र, सीएमपीडीआय आहेत. तसेच केंद्रीय वन विकास महामंडळाचे कार्यालय याच भागात आहे. सोबतच याभागात अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. ग्रामीण पोलीस मुख्यालय, परिवहन कार्यालय(ग्रामीण) आहेत.

सर्वांना घरे साठी उत्तम ठिकाण
प्रधानमंत्री आवास योजना गृहनिर्माण अंतर्गत सर्वांना घरे उपलब्ध करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. उत्तर नागपुरात कमी किमतीत जमीन उपलब्ध असल्याने या भागात ही योजना राबविण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध आहे.
२० मिनिटात विमानतळावर पोहचता येईल
राष्ट्रीय महामार्ग -७ वर विमानतळ ते आॅटोमोटिव्ह चौक या दरम्यात तीन मोठे उड्डाण पूल प्रस्तावित आहेत. या पुलांची निर्मिती झाल्यानंतर आपल्या स्वत: च्या वाहनाने या भागातून अवघ्या २० मिनिटात विमानतळावर पोहचणे शक्य होणार आहे. विमानतळ ते अजनी चौक, संविधान चौक (रिझर्व्ह बँक) ते कडबी चौक, तसेच तुली मॉल ते आॅटोमोटिव्ह चौक दरम्यान भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) उड्डाण पुलांचे निर्माण करणार आहे. याबाबतचा प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. याला लवकरच मंजुरी मिळणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे.

 

Web Title: Nagpur is changing the look of Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.