नागपुरात सव्वाआठ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 09:58 PM2018-09-20T21:58:07+5:302018-09-20T21:58:51+5:30

लखनौच्या कंपनीच्या आॅनलाईन रिचार्जच्या व्यवसायात लाखोंचा लाभ देण्याचे आमिष दाखवून ठगबाजांच्या एका आंतरराष्ट्रीय टोळीने मनीषनगरातील रूपक लक्ष्मीधर इंगळे (वय ४२) यांची ८ लाख २५ हजारांची रक्कम हडपली.

In Nagpur cheated Rs8.25 lakh | नागपुरात सव्वाआठ लाखांचा गंडा

नागपुरात सव्वाआठ लाखांचा गंडा

googlenewsNext
ठळक मुद्देआमिष दाखवून फसवणूक : बेलतरोडीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लखनौच्या कंपनीच्या आॅनलाईन रिचार्जच्या व्यवसायात लाखोंचा लाभ देण्याचे आमिष दाखवून ठगबाजांच्या एका आंतरराष्ट्रीय टोळीने मनीषनगरातील रूपक लक्ष्मीधर इंगळे (वय ४२) यांची ८ लाख २५ हजारांची रक्कम हडपली.
प्रमोद मिश्रा (वय ४५, रा. लखनौ), मोहम्मद नसीम खान (वय ५०, रा. लखनौ), कुनेंद्रकुमार (वय ४२, रा. लखनौ, उत्तर प्रदेश), संजय डे (वय ४०, रा. जबलपूर, मध्य प्रदेश) आणि अमित ढोमणे (वय ३८, रा. सक्करदरा, नागपूर), अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत. मनीषनगरातील न्यू बालपांडे लेआऊटमध्ये राहणारे रूपक लक्ष्मीधर इंगळे (वय ४२) हे मोबाईल रिचार्जचा व्यवसाय करतात. आरोपी संजय डे आणि अमित ढोमणे २५ जून २०१८ ला इंगळेंच्या घरी गेले. आमची मल्टीमॅक्स सर्व्हिसेस प्रा.लि. लखनौ ही मोठी आॅनलाईन मोबाईल रिचार्ज कंपनी असून, या कंपनीशी जुळल्यास तुम्हाला अल्पावधीत लाखोंचा लाभ मिळेल, असे आमिष दाखविले. इंगळेंना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी काही दिवसांनी कंपनीचे संचालक म्हणून खान आणि मिश्रा हे दोघे गेले. त्यांनी १० लाख रुपयात कंपनीचे शेअर घेतल्यास कोट्यवधींचा लाभ मिळेल, असे आमिष दाखवून त्यांना खोटी आकडेवारीही सांगितली. त्यावर विश्वास ठेवून इंगळेंनी काही रक्कम स्वत:जवळची, काही सासऱ्याजवळची आणि काही आपल्या मित्रांकडून उधार घेतली. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे एकूण ८ लाख २५ हजार रुपये आरोपींच्या स्टेट बँक हजरत गंज लखनौ शाखेतील खात्यात जमा केली. ही रक्कम काढून घेतल्यानंतर आरोपींनी इंगळेंना ठरल्याप्रमाणे रिचार्ज पुरविले नाही.

साऱ्यांचीच टाळाटाळ
आरोपींनी ठरल्याप्रमाणे रकमेचे रिचार्ज पुरविले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी इंगळे यांनी डे आणि ढोमणेंकडे विचारपूस केली. ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे इंगळे यांनी आपली रक्कम परत मागितली. यावेळी डे आणि ढोमणेंनी मिश्रा आणि खानचे नाव सांगितले. मिश्रा आणि खानकडे पैशाची मागणी केली असता, त्यांनी कुनेंद्रकुमारचे नाव सांगितले. कुनेंद्रकुमारने आपला काहीएक संबंध नसल्याचे सांगून हात झटकले. सर्वांनी संगनमत करून आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने इंगळे यांनी बेलतरोडी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. सहायक पोलीस निरीक्षक हनवते यांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी सुरू आहे.

Web Title: In Nagpur cheated Rs8.25 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.