नागपुरात अल्पवयीन मजुराला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:39 PM2018-03-26T23:39:17+5:302018-03-26T23:39:28+5:30
नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने कामठीतील एका हार्डवेअर व्यापाऱ्याने बाल मजुरास बेदम मारहाण केली. यामुळे दुखावलेला बाल मजूर स्वत:ला नुकसान पोहोचवण्याच्या तयारीत होता. परंतु वेळीच घटना उघडकीस आल्याने अनर्थ टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने कामठीतील एका हार्डवेअर व्यापाऱ्याने बाल मजुरास बेदम मारहाण केली. यामुळे दुखावलेला बाल मजूर स्वत:ला नुकसान पोहोचवण्याच्या तयारीत होता. परंतु वेळीच घटना उघडकीस आल्याने अनर्थ टळला.
पोलीस सूत्रानुसार कल्पतरू कॉलनी येथील सुशील रावलानी याचे रुईगंज सिरीया मैदान येथे हार्डवेअरचे दुकान आहे. रावलानीने तीन-चार महिन्यांपूर्वी १५ वर्षाच्या एका बाल मजुरास आपल्या दुकानात कामावर ठेवले होते. अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. आई मजुरी करून घर चालवते. आईला मदत म्हणून अल्पवयीन मुलगाही काम करू लागला. त्याला साडे तीन हजार रुपये महिना वेतन दिले जात होते. काही दिवसानंतरच त्याला रावलानी यांचा स्वभाव पसंद आला नाही. परंतु गरज असल्याने नाईलाजास्तव त्याने काम सुरू ठेवले. परंतु काही दिवसांपासून तो नोकरी सोडण्याच्या तयारीत होता. मुलाच्या तक्रारीनुसार १६ मार्च रोजी रात्री रावलानीने काम न सोडण्याची धमकी देत त्याला बेल्टने मारहाण केली. या घटनेमुळे तो अतिशय दुखावला गेला. तो स्वत:ला नुकसान पोहोचवण्याच्या तयारीत होता. त्याची अवस्था पाहून आई व इतर लोकांना संशय आला. त्यांनी अधिक विचारपूस केली असता मुलाने घडलेला प्रसंग सांगितला. यानंतर जुनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपासानंतर गुन्हा दाखल केला. रावलानी यांनी मात्र मारहाण केल्याचे नाकारले आहे.