नागपूर गारठले, पारा ९.४ वर; विदर्भात थंड लाटेची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2023 10:24 PM2023-02-04T22:24:41+5:302023-02-04T22:25:05+5:30
Nagpur News शनिवारी नागपूर विदर्भातील सर्वात थंड शहर ठरले. शहराचे किमान तापमान सरासरीपेक्षा ५ अंशाने घसरून ९.४ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली.
नागपूर : शनिवारी नागपूर विदर्भातील सर्वात थंड शहर ठरले. शहराचे किमान तापमान सरासरीपेक्षा ५ अंशाने घसरून ९.४ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. ऐन हिवाळ्यात तब्बल २५ दिवसांनंतर पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून उकाड्याचा अनुभव घेणाऱ्या नागपूरकरांना हिवाळा संपता संपता थंडीने चांगलेच गारठवले. यासह येत्या २४ तासात विदर्भाला थंडीच्या लाटेचा सामना करावा लागेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
फेब्रुवारी महिन्यात थंडीचा काळ संपण्याची चाहूल लागते. या महिन्यात किमान तापमान हळूहळू वाढायला लागते व ग्रीष्मकाळ सुरू हाेताे. मात्र मागील चार वर्षात फेब्रुवारीत पारा १० अंशांच्या खाली नाेंदविला आहे. २०१९ मध्ये १० फेब्रुवारीला रात्रीचे तापमान ६.३ अंशावर घसरले हाेते. दरम्यान, यावर्षी नागपूरसह वैदर्भीयांना थंडी फारसी जाणवली नाही. हिवाळ्याच्या १२० दिवसांपैकी ५-६ दिवसच कडाक्याची थंडी जाणवली. उरलेले दिवस गारव्याचा अनुभव हाेत हाेता. जानेवारीच्या ८ तारखेला पारा ८ अंशांवर पाेहोचला हाेता. ९ जानेवारीला त्यात थाेडी वाढ झाली. त्यानंतर मात्र थंडीने पाठ फिरवली व पारा सरासरी किंवा त्यापेक्षा अधिकच राहिला. गेले काही दिवस तर उष्णता जाणवू लागली हाेती. मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वातावरण बदलले. पश्चिम हिमालयात तयार झालेल्या पश्चिमी झंझावातामुळे वातावरण बदलले आहे.
दरम्यान, नागपूरसह विदर्भात बहुतेक जिल्ह्यात किमान तापमान सरासरीच्या खाली घसरले आहे. गाेंदिया १०.६ अंश, यवतमाळ १०.७ अंश, अकाेला ११ अंश तर गडचिराेली, वर्धा, चंद्रपूर, अमरावतीत १२ अंशांच्या आसपास पारा पाेहोचला. रात्रीचा पारा घसरला असला तरी दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या १ ते २.५० अंशाने अधिक आहे. त्यामुळे दिवसा उन्हाची जाणीव हाेत आहे. रात्री व पहाटे मात्र गारठा वाढला आहे. पुढचे काही दिवस किमान तापमान सरासरीच्या खालीच राहणार आहे. ७ फेब्रुवारीनंतर त्यात वाढ हाेण्याचा अंदाज आहे.