नागपुरात चक्क ‘यमराज’ उतरले रस्त्यावर; खड्ड्यांच्या विरोधात अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 11:25 AM2022-08-29T11:25:25+5:302022-08-29T11:55:25+5:30

नागपूर ‘सिटीझन फोरम’चे अभिनव आंदोलन : खड्डे दाखवा-झोपेतून जागवा

nagpur citizens forum agitation against bad roads and potholes | नागपुरात चक्क ‘यमराज’ उतरले रस्त्यावर; खड्ड्यांच्या विरोधात अनोखे आंदोलन

नागपुरात चक्क ‘यमराज’ उतरले रस्त्यावर; खड्ड्यांच्या विरोधात अनोखे आंदोलन

Next

नागपूर : नागपुरचे रस्ते म्हणजे अक्षरश: मृत्यूचा मार्गच असल्याची स्थिती झाली आहे. मुसळधार पावसामुळे निकृष्ठ रस्त्यांचे डांबरही उखडले असून, उखडलेली गिट्टी अपघाताचे कारण ठरत आहे. दरम्यान, एसटी स्टॅंडजवळील रस्त्यावरील खड्ड्यांमधून रविवारी दुपारी मार्ग काढत असताना अनेक वाहनचालकांना आश्चर्याचा धक्काच बसला व त्यांच्या समोर साक्षात यमराजच अवतरले आणि वाहनचालकांना म्हणाले, खड्डा चुकवून चाल भाऊ, नाहीतर तुला वर घेऊन जाईन.

नागपूर सिटीझन्स फोरमतर्फे ‘खड्डे दाखवा- झोपेतून जागवा’ ही मोहीम हाती घेण्यात आली असून याअंतर्गत एसटी स्टॅंडजवळ तसेच अमरावती मार्गावर प्रतीकात्मक आंदोलन करून नागपूरकरांना जागवत प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घआलण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनात नागपूर सिटिझन्स फोरमचे समन्वयक रजत पडोळे यांनी यमराजाची वेशभूषा साकारली. यासह नागरिकांनाही खड्ड्यांचे फोटो पाठविण्याचे आवहन यानिमित्ताने करण्यात आले. 

नागपूर-अमरावती महामार्गावरील नागपूर विद्यापीठ कॅम्पस परिसर ते वाडी नाक्यापर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच जागोजागी बारिक गिट्टीचा सडा पडला असून वाहने घसरल्याने अनेक वाहनचालक जखमी होत आहेत. शहरातील विविध मार्गांवर अपघात होत असून येजा करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. 

ही समस्या मांडण्यासाठी यमराजाची भूमिका साकारुन वाहनचालकांची थांबवत जनजागृती करण्यात आली. धोका अधोरेखित करणारे पथनाट्य सादर करण्यात आले. या आंदोलनात फोरमच्या सदस्यांसह स्थानिक नागरिक व या रस्त्यांवरून दररोज येजा करणाऱ्या नागरिकांनी सहभाग घेतला. लाईव सिटी एप, ट्वीटर व फेसबूक यासारख्या समाज माध्यमातून होणाऱ्या तक्रारींची प्रशासन दखल घेत नसल्याने नाईलाजाने आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागत असल्याचे सिटीझन फोरमतर्फे स्पष्ट करण्यात आले.

या आंदोलनात फोरमचे सदस्य अभिजीत सिंह चंदेल, अमित बांदूरकर, अभिजीत झा, अमेय पन्नासे, रिया पिंपळकर, अमोल अगस्ती, अंगिरा पांडे, सोमनाथ जाधव, गौरव देशपांडे, शिवम उमरेडकर, प्रज्वल गोड्डे, रुपेश चौधरी, संकेत महाले, सुरेश चौधरी, आयुष चांभारे, संदेश उके, स्वप्नील भालधरे, केतन रणदिवे आदी सदस्य उपस्थित होते.

Web Title: nagpur citizens forum agitation against bad roads and potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.