नागपुरातील एम.एल. कॅन्टीन हटवण्याच्या कारवाईला नागरिकांनी केला प्रचंड विरोध; कारवाई थांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2022 08:01 PM2022-05-10T20:01:27+5:302022-05-10T20:02:26+5:30
Nagpur News मोमीनपुरा येथील मुस्लिम लायब्ररी परिसरात मनपाच्या जागेवर सुरू असलेले एम. एल. कॅन्टीन हटविण्यासाठी मनपाच्या प्रवर्तन विभागाची तीन पथके मंगळवारी येथे धडकली. मात्र त्यांना जनक्षोभामुळे परत जावे लागले.
नागपूर : मोमीनपुरा येथील मुस्लिम लायब्ररी परिसरात मनपाच्या जागेवर सुरू असलेले एम. एल. कॅन्टीन हटविण्यासाठी मनपाच्या प्रवर्तन विभागाची तीन पथके मंगळवारी येथे धडकली. मात्र, २०० ते २५० लोकांच्या जमावाने कारवाईला प्रचंड विरोध केल्याने अतिक्रमण न हटविताच पथकांना माघारी फिरावे लागले.
मनपाच्या गांधीबाग झोन क्षेत्रातील मोमीनपुरा येथे मुस्लिम लायब्ररीला भाडेपट्ट्यावर जागा देण्यात आलेली होती. त्या जागेवर अतिक्रमण करून एम.एल.कॅन्टीचे बांधकाम करण्यात आले आहे. यासंदर्भात, उच्च न्यायालयाने मनपाला कायद्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रवर्तन विभागाची तीन पथके या परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी पोहोचली होती. कारवाईला सुरुवात करून दक्षिण-पश्चिमेकडील काही भाग तोडण्यात आला व टिनाचे शेड हटविले. दरम्यान, कारवाई सुरू असताना घटनास्थळी मोठा जमाव जमला. काही लोकांनी जेसीबी पुढे येऊन अडथळा आणला. परिसरातील नागरिकांचा अतिक्रमण हटविण्याला विरोध वाढल्याने व पोलीस बंदोबस्त नसल्याने पथकाला कारवाई थांबवावी लागली. पोलीस बंदोबस्तात पुढील कारवाई करणार असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही कारवाई प्रवर्तन विभागाचे उपायुक्त अशोक पाटील, प्रर्वतन अधीक्षक श्रीकांत वैद्य, निरीक्षक संजय कांबळे यांच्यासह मनपा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.