नागपूर शहर टँकरमुक्त होणार!
By admin | Published: July 4, 2016 02:43 AM2016-07-04T02:43:05+5:302016-07-04T02:45:43+5:30
नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार
मुख्यमंत्री : अमृत योजनेंतर्गत १०० कोटी, सुरेश भट सभागृहासाठी ६० कोटी, पूरग्रस्तांसाठी ५९ कोटी रुपये
नागपूर : नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना करताना शहर टँकरमुक्त करण्यासाठी ‘अमृत’ योजनेंतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
हैदराबाद हाऊस येथे रविवारी नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्पांच्या प्रगतीसंदर्भात आढावा घेताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर प्रवीण दटके तसेच जिल्ह्यातील आमदार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शहरातील अनधिकृत वस्त्या व इतर भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठाऐवजी अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून महानगरपालिकेने तात्काळ विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. मागील पावसाळ्यात शहरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी ५९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या सुरेश भट सभागृहासाठी ६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गरिबांना परवडेल, अशा घरांची निर्मिती करण्यात आली. महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास व महसूल विभागांकडे असलेल्या १४० हेक्टर जागेचा प्रस्ताव १५ दिवसांत सादर करण्याच्या सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले की, गृहबांधणीचा कार्यक्रम तयार करताना गृहनिर्माण मंडळासह सर्व यंत्रणांनी ‘लो कॉस्ट हाऊसिंग’ची योजना तयार करावी. यासाठी महानगरपालिका आयुक्त हे या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून काम पाहतील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सेमिनरी हिल्स इको फ्रेण्डली पार्क करणार
सेमिनरी हिल्स परिसरात असलेल्या नैसर्गिक सौंदर्याचे जतन करताना तेथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करून इको फ्रेंडली पार्क तयार करण्यासंदर्भात वनविभागाने एक महिन्यात आराखडा सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. सेमिनरी हिल्स परिसरात पिण्याच्या पाण्याचा वापर न करता बगिचाच्या सौंदर्यीकरणासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा विकसित करावी. गोरेवाडा परिसराच्या विकास आराखड्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.
कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी आधुनिक तंत्राचा वापर
नागपूर शहराचा मेट्रो रिजन विकास आराखडा आॅगस्टपूर्वी मंजूर करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले की, शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचऱ्याचे एकूण नियोजन करून अत्यंत कमी जागेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत त्यावर प्रक्रिया करावी. शहरांमध्ये नवीन बांधकामांना परवानगी देताना कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भात व त्यावर तेथेच प्रक्रिया करण्याची तरतूद करावी, असेही त्यांनी सांगितले.
‘हेरिटेज वॉक ’
संकल्पना राबविणार
झिरो माईलचे मेट्रो रेल्वेतर्फे सौंदर्यीकरण व विकास करण्यात येणार असून देशाच्या हृदयस्थानी असलेल्या या वास्तूसोबतच इतरही स्थळांना पर्यटकांनी भेट द्यावी, यासाठी हेरिटेज वॉक ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वे स्टेशनसह या भागाचा विकास आराखडा फ्रान्स येथील वास्तू विशारद जोशी हे करणार असल्याचे मेट्रो रेल्वेचे बृजेश दीक्षित यांनी सांगितले. यावेळी आमदार निवास डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेवरील पाथ-वे नागपूर शहराच्या विकासासाठी विशेष निधी, विधानभवन इमारत परिसरातील बांधकाम आदी विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली.
गडकरींनी नासुप्र अधिकाऱ्यांना धारेवर धरले
नागपूर सुधार प्रन्यासच्या एकूणच कामकाजावर केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांचा उपस्थितीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. हैदराबाद हाऊस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूर शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधान आवास योजनेचा विषय निघाला तेव्हा गडकरी संतप्त झाले. पंतप्रधान आवास योजनेसाठी आवश्यक जागा नासुप्र अजूनही उपलब्ध करून देऊ शकली नाही. तेव्हा गडकरी यांनी आपल्या शैलीत नासुप्रला धारेवर धरीत अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. जागा तातडीने मिळत नाही. अधिकारी ‘लक्ष्मी’दर्शनाशिवाय कामाला हात लावत नाही. अशा अधिकाऱ्यांना बदलविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
कस्तूरचंद पार्क, चिटणीस पार्कसह
यशवंत स्टेडियमचा विकास
कस्तूरचंद पार्कचे ऐतिहासिक महत्त्व तसेच या परिसराच्या सौंदर्यीकरणा सोबत आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी अांतरराष्ट्रीय दर्जाच्या वास्तुविशारदाकडून आराखडा तयार करावा, अथवा स्पर्धा घेऊन शहराच्या सौंदर्यीकरणांमध्ये भर पडेल, अशा पद्धतीने नियोजन करावे, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच चिटणीस पार्कच्या सौंदर्यीकरणासोबत येथे पार्किंगची सुविधा तसेच खेळासाठी आवश्यक असलेले मैदान विकसित करणे, त्यासोबत यशवंत स्टेडियम आणि सभोवतालच्या जागेच्या विकासाचा एकत्रित आराखडा तयार करण्यात येणार आहे.
केंद्राकडून निधी उपलब्ध करून देणार - नितीन गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहरातील विकास योजना राबविताना कालबद्ध कार्यक्रम तयार करावा. तसेच शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही यावेळी सांगितले.
विशेष निधी मिळावा - पालकमंत्री बावनकुळे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर शहरातील पंजाबराव कृषी विद्यापीठात पाथ-वे, कस्तूरचंद पार्क, चिटणीस पार्क, विधानभवन, सेमिनरी हिल्स, गोरेवाडा तसेच नागपूर शहरासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी केली.
आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकही होणार
दरम्यान आ. डॉ. मिलिंद माने यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी रविवारी विविध विषयांचा आढावा घेतला. यात पटवर्धन मैदानावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाचाही विषय होता. या जागेवर स्मारक होणार असून त्यादृष्टीने तीन ते चार आराखडे तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.