पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या वेळी नागपूर शहराच्या सीमा होणार ‘सील’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2022 03:16 PM2022-12-09T15:16:34+5:302022-12-09T15:19:10+5:30
एनएसजी-फोर्स वनचे अधिकारी शहरात : एसपीजीच्या आयजीसह १० एसपी आले
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान रविवारी शहराच्या सीमा चार तासांसाठी सील करण्यात येतील. विविध यंत्रणांचे जवळपास चार हजार अधिकारी-जवान सुरक्षा व्यवस्थेत तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय एनएसजी आणि फोर्स वनच्या जवानांचे पथकदेखील पोहोचले आहेत.
पंतप्रधान विमानतळ ते नागपूर रेल्वे स्थानकापर्यंत रस्त्याने, फ्रिडम पार्क ते खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने आणि तेथून परत समृद्धी महामार्गावर रस्त्याने प्रवास करणार आहेत. सुमारे तीन तास मोदी विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. या कालावधीत शहरातील सर्व सीमा सील करण्यात येणार आहेत.
रस्त्यांवर सुरक्षेसाठी १०० अधिकारी
- १०० अधिकारी आणि १ हजार ४०० कर्मचारी रस्ते मार्गावरच तैनात करण्यात आले आहेत. सभेच्या ठिकाणी एक हजार जवान तैनात असतील. एक अतिरिक्त आयुक्त, १५ उपायुक्त, २५ सहायक आयुक्त आणि एक हजार कर्मचारी बाहेरच्या जिल्ह्यातून मागवण्यात आले आहेत.
- पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एसपीजी महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक दर्जाचे नऊ अधिकारी बुधवारीच नागपुरात दाखल झाले आहेत. मुंबईतील गजानन राजमाने यांच्या नेतृत्वाखाली फोर्स वनच्या १५० जवानांनीही मोर्चा सांभाळला आहे.
रेल्वे स्टेशनवर संत्रा मार्केटद्वारातूनच प्रवेश
वंदे भारत ट्रेनला मोदी हिरवा झेंडा दाखविणार असल्याने रेल्वे स्थानकाचे मुख्य द्वार प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. एलआयसी चौक, विधान चौक, मानस चौक ही स्थानके वाहतुकीसाठी बंद राहतील. स्थानकावर जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी ७ ते ११ या वेळेत संत्रा मार्केट येथील पूर्वेकडील द्वाराचा वापर सुरू ठेवण्यात येणार आहे.