नागपूर शहर बस चालक-वाहकांचा अचानक संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 01:07 AM2018-08-05T01:07:06+5:302018-08-05T01:13:55+5:30
महापालिकेच्या परिवहन विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी शहराच्या विविध भागातील शहर बसच्या २५ बसची तपासणी केली असता यात मोठ्या प्रमाणात विना तिकीट प्रवासी आढळून आले. यातील एका बसच्या वाहकाला ओळखपत्र विचाले असता त्याने ओळखपत्र देण्यास नकार दिला. यावरुन त्याला बसमधून खाली उतरवण्यात आले. यावरून त्याने वाद घातला. त्याने याची चुकीची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. पदाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार शहर बसच्या चालक-वाहकांनी शनिवारी दुपारी १.४५ वाजेपासून अचानक संप पुकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी शहराच्या विविध भागातील शहर बसच्या २५ बसची तपासणी केली असता यात मोठ्या प्रमाणात विना तिकीट प्रवासी आढळून आले. यातील एका बसच्या वाहकाला ओळखपत्र विचाले असता त्याने ओळखपत्र देण्यास नकार दिला. यावरुन त्याला बसमधून खाली उतरवण्यात आले. यावरून त्याने वाद घातला. त्याने याची चुकीची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. पदाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार शहर बसच्या चालक-वाहकांनी शनिवारी दुपारी १.४५ वाजेपासून अचानक संप पुकारला. यात अर्ध्याहून अधिक बसचे कर्मचारी सहभागी झाल्याने दुपारनंतर शहरातील बस वाहतूक कोलमडली. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना बसस्थानकांवर बराच वेळ ताटकळत बसावे लागले.
शहर बसवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या आयबीटीएम आॅपरेटर डिम्टस्ने आहे. परंतु या कंपनीचे नियंत्रण नाही. तिकीट निरीक्षक व वाहक यांच्यातील संगनमतामुळे तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे. तिकीट न देता प्रवाशांकडून पैसे वसूल केले जातात. याची माहिती परिवहन विभागाला मिळाली होती. यामुळे महापालिकेच्या भरारी पथकाने शनिवारी २४ बसची तपासणी केली. यात दोन बसमध्ये प्रत्येकी ४९ प्रवासी असताना ९ प्रवाशांनाच तिकीट दिल्याचे आढळून आले. एका बसमध्ये ४४ प्रवासी असताना ४० प्रवाशांकडे तिकीट होते. असाच प्रकार इतर बसमध्ये आढळून आला. पटवर्धन डेपोतील एका बसचा वाहक कुलदीप कॅथवास याने सर्व प्रवाशांना तिकीट दिलेले नव्हते. यासंदर्भात त्याला विचारणा केली असता तोच उलट अरेरावी करू लागला. यामुळे त्याला बसमधून खाली उतरवण्यात आले. त्यावेळी मोरभवन डेपोत ४१ बसेस उभ्या होत्या. बस कर्मचारी संघटनेचे नेते भाऊ राव रेवतकर व अंबादास शेंडे यांनी अचानक संप पुकारल्याची घोषणा केली. यामुळे या डेपोतून बसेस बाहेर पडणे बंद झाले. काही वेळातच शहराच्या इतर भागातील बसच्या चालक व वाहकांना याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे सायंकाळपर्यत ६० टक्के बसेस डेपोत आणून उभ्या करण्यात आल्या. याची माहिती मिळताच परिवहन समितीचे अध्यक्ष बंटी कुकडे व परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप मोरभवन येथे पोहचले. परंतु संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संप सुरुच ठेवल्याची माहिती कुकडे यांनी दिली.
मेस्मा अंतर्गत कारवाई करणार
गेल्या काही महिन्यापूर्वी शहर बस कर्मचाºयांनी संप पुकारला होता. यामुळे निर्माण झालेली परिस्थिती विचारात घेता शहर बसच्या कर्मचाऱ्यांचा संपाला राज्य सरकारने मेस्मा लावला होता. त्यामुळे कर्मचारी संघटनेला संप मागे घ्यावा लागला होता. अद्याप मेस्मा लागू असल्याने संपासंदर्भात कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली जाणार आहे. रविवारी संप मागे न घेतल्यास संपात सहभागी कर्मचाऱ्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
पोलिसात तक्रार दाखल करणार
परिवहन विभागाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता बस कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा प्रभावित झालेली आहे. तसेच विना तिकीट प्रवासी आढळून आल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची महिती शिवाजी जगताप यांनी दिली.