नागपूर शहर पोलिसातील १७ कामचुकार कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 11:09 PM2020-10-13T23:09:45+5:302020-10-13T23:11:03+5:30
Nagpur city policemen suspend, crime news शहर पोलीस विभागातील १७ कामचुकार कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबनाचा बडगा उगारला आहे. आपल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी या सर्वांचे निलंबनाचे आदेश काढले आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येत पोलिसांना निलंबित करण्याची ही शहरातील पहिलीच वेळ आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलीस विभागातील १७ कामचुकार कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबनाचा बडगा उगारला आहे. आपल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी या सर्वांचे निलंबनाचे आदेश काढले आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येत पोलिसांना निलंबित करण्याची ही शहरातील पहिलीच वेळ आहे.
नागपुरात पोलिसांचे मनुष्यबळ तसेही कमी आहे. अशातच अनेकजण आजारपणाचे कारण सांगून किंवा अन्य कारण दर्शवून ड्युटीवर नसतात. एखादा मोठा बंदोबस्त आला की अचानकपणे पोलिसांमध्ये असा प्रकार पहावयास मिळतो. यातील काही तर अनेक दिवस गैरहजर असतात. आपण अनुपस्थित असल्याची अधिकृत सूचनाही ते देत नसल्याचा प्रकारही निदर्शनास आला आहे. काही कर्मचाऱ्यांना दारूचे व्यसनही जडले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना यापूर्वी सुधारण्याची तंबीही दिली आहे.
पोलिसांच्या या कामचुकारपणामुळे पोलीस विभागाचे कामकाज प्रभावित होत आहे. हे लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी चार दिवसात आपल्या कामकाजात सुधारणा करण्याची तंबी दिली होती. या नंतरही अपेक्षित सुधारणा न दिसल्याने त्यांनी ही कारवाई केली.
प्रारंभी पोलीस आयुक्तांची सेवा आणि सहकार्य पाहून पोलीस आधी बरेच प्रभावित झाले होते. कोरोनाच्या संकटात पोलिसांना तात्काळ सेवा मिळावी यासाठी मदत मिळविण्यात त्यांनी पुढाकारही घेतला होता. काहींना अपेक्षित ठिकाणी बदलीही दिली होती, मात्र निलंबनाच्या या कठोर भूमिकेमुळे त्यांच्यातील नवे रूप पोलिसांना अनुभवास मिळाले आहे. कामचुकारपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराच त्यांनी या कारवाईतून दिला आहे.