नागपुरात ताप, सर्दी, खोकल्याने वाढविली डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:05 AM2018-01-16T00:05:07+5:302018-01-16T00:08:30+5:30
वातावरणातील बदलांच्या परिणामामुळे विषाणूजन्य ताप, खोकला व सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचारासाठी येत आहेत. विशेषत: या आजाराच्या रुग्णांत सर्वाधिक लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वातावरणातील बदलांच्या परिणामामुळे विषाणूजन्य ताप, खोकला व सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचारासाठी येत आहेत. विशेषत: या आजाराच्या रुग्णांत सर्वाधिक लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
उपराजधानीत गेल्या आठवड्यात थंडीत वाढ झाली होती तर गेल्या दोन दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. दिवसा कडक उन्ह आणि सकाळी व सायंकाळी थंड वाऱ्यांमुळे विषाणूजन्य आजारात वाढ होत आहे. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी अशा विविध कारणांनी लोक आजारी पडले आहेत. यामुळे औषधोपचारासाठी दवाखान्यात रुग्णांच्या रांगाच्या रांगा दिसत आहेत. यातच डेंग्यू रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याने लोकांत भीतीचे वातावरण आहे.
श्वासांद्वारे एकाकडून दुसऱ्याकडे जंतू संक्रमित
तज्ज्ञांच्या मते, ‘व्हायरल फिव्हर’ म्हणजे संक्रमित ताप. या तापाचे विषाणू घशात सुप्तावस्थेत निष्क्रिय राहतात. थंड वातावरणाशी संपर्क आल्यास किंवा थंड पाणी, आईसक्रीम, कोल्डड्रिंक प्यायल्यास विषाणू सक्रिय होतात आणि रोगप्रतिकारक शक्तीवरच हल्ला चढवितात. हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. श्वासांद्वारे एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाकडे जंतू संक्रमित होत असल्याने एकाच घरात व्हायरल फिव्हरचे एकापेक्षा जास्त रुग्ण दिसून येतात.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
वातावरणातील बदलाचा परिणाम विशेषत: लहान मुलांवर अधिक दिसतो. प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना लवकर विषाणूजन्य आजार होतात. वृद्धांनाही ताप, खोकला, अंगदुखी आदी व्याधी जाणवू लागल्या आहेत. यामुळे सर्दी, खोकला, ताप अंगावर काढू नका. तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या शिवाय गर्दीचे ठिकाण टाळा. पुरेशी झोप घ्या. बाहेरील खाद्यपदार्थ टाळा. परीक्षेचे वातावरण असले तरी तणावाला दूर ठेवा.
-डॉ. अविनाश गावंडे
सहयोगी प्राध्यापक, मेडिकल