Nagpur: शहराचे काँक्रिटीकरण प्रचंड धोकादायक, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 23:09 IST2023-05-27T23:09:35+5:302023-05-27T23:09:51+5:30
Aditya Thackeray: नागपूर शहराचे काँक्रिटीकरण प्रचंड धोकादायक असल्याचे मत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडले. कोराडी थर्मल पॉवरमध्ये आयएमए प्रकल्पाला पुन्हा सुरू करने, विकासाच्या नावाखाली वृक्षांची सर्रास कटाई करण्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी नुकताच नागपूरचा दाैरा केला.

Nagpur: शहराचे काँक्रिटीकरण प्रचंड धोकादायक, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मत
- मेहा शर्मा
नागपूर - शहराचे काँक्रिटीकरण प्रचंड धोकादायक असल्याचे मत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडले. कोराडी थर्मल पॉवरमध्ये आयएमए प्रकल्पाला पुन्हा सुरू करने, विकासाच्या नावाखाली वृक्षांची सर्रास कटाई करण्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी नुकताच नागपूरचा दाैरा केला. त्यांनी पर्यावरणवादी आणि नागरिकांचे मत ऐकले आणि 'लोकमत'शी विशेष चर्चा करताना आपली प्रतिक्रिया नोंदवली.
ते म्हणाले, पर्यावरणाच्या रक्षणासाठी संघर्ष करने कुण्या एका व्यक्तीचे काम नाही. हा राजकीय मुद्दासुद्धा नाही. हे मुद्दे विधानसभेत लावून धरले जाईल. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. ते म्हणाले की, नागपूरवासी चिरस्थायी विकासासंंबंधात आपल्या भूमिकेवर अडिग आहेत, हे बघून आनंद होतो आहे. मात्र, शहराचे वेगाने होणारे काँक्रिटीकरण धोकादायक आहे. जोशीमठ याचे ताजे उदाहरण आहे. नागपूरात पर्यावरणवाद्यांनी कोराडी प्रकल्पाचा विस्तार, राखेची समस्या आणि आयएमएस प्रकल्पाशी संबंधित मुद्दे उचलून धरले आहेत. आपण मंत्री असताना या मुद्द्यांची गंभीर दखल घेऊन चुकीचे काम होऊ नये, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, संवादावर विश्वास नसलेल्या सरकारसोबत आज संघर्ष होताना दिसतो आहे. हा व्यक्तीगत अहंकाराचा भाग नाही तर शहराच्या वर्तमान आणि भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण शांत बसणार नसल्याचे ते म्हणाले.
ठाकरे पुढे म्हणाले की, राज्य सरकार सामान्य जनतेच्या नव्हे तर बिल्डर्स आणि कंत्राटदाराच्या हिताचे धोरण राबवित आहे. सत्तेचा लोभ अन् भ्रष्टाचाराच्या जोरावर बनलेले राज्य सरकार जनहित आणि पर्यावरणाच्या हिताचे पावलं उचलत नसल्याचाही आरोप त्यांनी केला. आमच्या सरकारने पर्यावरण आंदोलनाला सकारात्मक पद्धतीने घेऊन त्यांचे मुद्दे गांभिर्याने ऐकले. आज असे होत नसल्याचेही ते म्हणाले.