नागपुरात विद्यार्थ्यांना पाजले शौचालयाचे पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 08:34 PM2018-03-03T20:34:01+5:302018-03-03T20:34:23+5:30
जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे २३ व २४ फेब्रुवारीला काटोल कन्या शाळेच्या मैदानावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना शौचालयाचे पाणी प्यावे लागले. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने शिक्षण विभागाचे बिंग फुटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे २३ व २४ फेब्रुवारीला काटोल कन्या शाळेच्या मैदानावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना शौचालयाचे पाणी प्यावे लागले. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने शिक्षण विभागाचे बिंग फुटले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणाला वाव देण्यासाठी दरवर्षी जि.प. च्या शिक्षण विभागातर्फे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. क्रीडा स्पर्धेबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते. दोन दिवसीय या महोत्सवात विद्यार्थ्यांची निवास आणि जेवणाचीही सोय प्रशासनातर्फे करण्यात येते. २३ व २४ फेब्रुवारीला या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेमध्ये वॉटर कॅन आणण्यात आल्या होत्या. परंतु त्यातील पाणी संपल्याने आयोजकांनी शौचालयातील बेसिनच्या नळाला पाईप लावून पाण्याच्या कॅनमध्ये टाकला होता. हे पाणी क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी व शिक्षक पित होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओत हे स्पष्ट दिसून येते.
एकंदरीतच हे आयोजन पूर्णत: भोंगळ ठरले. अनेक अनियमितता आढळल्या. पहिल्याच दिवशी क्रीडा सामने उशिरा सुरू झाले. कबड्डी सामन्यात गोंधळ झाला. सांस्कृतिक कार्यक्रम उशिरा सुरू झाला. रात्री ११ वाजता सांघिक नृत्य स्पर्धा सुरू असताना पोलिसांनी डीजे व साऊंड सिस्टीम उचलून नेली. दुपारचे शिळे जेवण विद्यार्थ्यांना रात्री देण्यात आले. निवासाची व्यवस्था योग्य नव्हती. विद्यार्थ्यांना धूळ असलेल्या रुममध्ये झोपविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी सामनास्थळी उपस्थित नसल्याने एक विद्यार्थी बेशुद्ध होऊन पडला. ही सर्व गैरसोय महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या सदस्यांनी मोबाईलबद्ध केली. विशेष म्हणजे या क्रीडा स्पर्धेसाठी विशेष निधीची तरतूद असते. ग्रामीण भागातून विद्यार्थी स्पर्धेसाठी येतात. अशी गैरसोय होत असेल, यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत असेल, तर जबाबदार कोण, असा सवाल संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केला आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ
शासकीय अनुदानातून या स्पर्धा होत असतात. या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी थोटे यांच्याकडे होती. येथे घडलेला सर्व प्रकार अतिशय भोंगळ होता. यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या. परंतु त्यांच्याकडून काहीच कारवाई झाली नाही. शासकीय निधीतून असले आयोजन म्हणजे एकप्रकारे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी प्रशासनाने केलेला खेळ आहे. अशा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
दिलीप लंगडे, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना