नागपूर गारठले, रात्रीचा पारा ९.९ अंशांवर; गाेंदिया सर्वाधिक थंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2023 09:57 PM2023-01-07T21:57:09+5:302023-01-07T21:57:32+5:30
Nagpur News गेल्या ९ व १० डिसेंबरनंतर पहिल्यांदा रात्रीचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. शनिवारी नागपूरचे किमान तापमान ९.९ अंश नाेंदविण्यात आले. विदर्भात ७ अंश तापमानासह गाेंदियात सर्वाधिक गारठा वाढला आहे.
नागपूर : ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे गेले तीन दिवस नागपूरकर दिवसा गारठले हाेते. मात्र, आकाशातून ढगांचे आच्छादन ओसरताच व धुके हटताच रात्रीचा गारठा वाढला आहे. गेल्या ९ व १० डिसेंबरनंतर पहिल्यांदा रात्रीचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. शनिवारी नागपूरचे किमान तापमान ९.९ अंश नाेंदविण्यात आले. विदर्भात ७ अंश तापमानासह गाेंदियात सर्वाधिक गारठा वाढला आहे.
आतापर्यंत धुक्यात राहिलेल्या हिमालय क्षेत्रासह उत्तर व पूर्वाेत्तर राज्यात पश्चिमी झंझावातामुळे पावसाळी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे तिकडच्या तापमानात काही अंशांची वाढ झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम मध्य भारत व विदर्भात झाला असून, किमान तापमानात घसरण झाली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत रात्रीचा पारा २४ तासांत २ ते ५ अंशांपर्यंत घसरला. नागपुरात ३.८ अंशांची घसरण हाेऊन ९.९ अंश किमान तापमानाची नाेंद करण्यात आली, जे सरासरीपेक्षा ३ अंशांनी कमी आहे. गाेंदियात सर्वाधिक ५.६ अंशांची घसरण झाली. विदर्भातील इतर शहरांचा विचार केल्यास वर्धा ११.८ अंश, चंद्रपूर १४ अंश, ब्रह्मपुरी ११.४ अंश, गडचिराेली १२, यवतमाळ १३ आणि अमरावती १३.१ अंश किमान तापमानाची नाेंद झाली, जे सरासरीपेक्षा काही अंशी कमी आहे. अकाेला, बुलढाण्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे.
दरम्यान, वातावरणाची स्थिती पाहता ८, ९ जानेवारीला मध्य प्रदेशसह विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यानंतर काहीसा दिलासा मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.