पोलिसांना दोन वर्षापासून गुंगारा देणारा 'मकोका'चा फरार आरोपी अखेर सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 02:25 PM2022-06-22T14:25:13+5:302022-06-22T14:33:47+5:30
लोकमतने ने रोशन शेख टोळीचे कारनामे प्रकाशित केले होते. त्यानंतर तत्कालीन डीसीपी गजानन राजमाने यांनी टोळीवर गुन्हे दाखल केले होते.
नागपूर : दोन वर्षापासून पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून शहरात फिरत असलेल्या मकोकाचा फरार आरोपी अभिषेक सिंह अखेर पोलिसांच्या हाती लागला. गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी अभिषेक सिंह याला अटक केली. सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळल्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला आहे.
२०२० मध्ये कुख्यात रोशन शेख टोळीवर मकोकाची कारवाई करण्यात आली होती. लोकमतने ने रोशन शेख टोळीचे कारनामे प्रकाशित केले होते. त्यानंतर तत्कालीन डीसीपी गजानन राजमाने यांनी टोळीवर गुन्हे दाखल केले होते. या टोळीवर हप्ता वसुली, अपहरण, जमिनीवर कब्जा, महिलांना ब्लॅक मेल करणे आदी गुन्हे दाखल होते. रोशनच्या टोळीत अभिषेक सिंह, अंकित पाली, इरफान खान ऊर्फ खानू, सलीम काजी तसेच सोहेल बरकाती होते. पोलिसांनी रोशन, खानू, सलीम व सोहेल याला अटक केली होती. अभिषेक सिंह व अंकित पाली फरार होते.
अभिषेक एका राष्ट्रीय पार्टीचा कार्यकर्ता म्हणून दिल्ली व उत्तर प्रदेशात नेत्यांसोबत दिसू लागला. पोलिसांनी अभिषेक व अंकितला फरार घोषित केले होते. अभिषेक सिंह याने जमानतीसाठी मकोका न्यायालय व उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. तिथेही त्याला दिलासा मिळाला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईला योग्य ठरवित अभिषेकची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे तो पोलिसांना शरण आला. अभिषेकला आज न्यायालयात सादर करून पोलिसांनी ७ दिवसाची कोठडी मिळविली आहे.
- अंकितचा कुठेही पत्ता नाही
या टोळीचा प्रमुख रोशन शेख अजूनही कारागृहात आहे. त्याच्या तीन साथीदाराना जमानत मिळाली आहे. अभिषेकच्या अटकेनंतर आता अंकित पाली हा फरार आहे. त्याच्याविरुद्ध खून व अन्य प्रकरणात गुन्हे दाखल आहे. गेल्या दोन वर्षात त्याच्या बाबत पोलिसांना कुठलीही ठोस माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणात सुरुवातीपासून सहभागी असलेला एक डॉक्टरही चर्चेत आहे.