नागपुरात भाजपाने घेतले नगरसेवकांचे राजीनामे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:36 PM2018-01-27T23:36:51+5:302018-01-27T23:38:18+5:30

खासदार, आमदारांच्या विरोधी पवित्र्यानंतर आता नगरसेवकांनीही पक्षाशी प्रसंगी बंडखोरी करू नये, त्यांच्यावर वचक राहावा व पक्षाच्या चौकटीबाहेर कुठलेही वर्तन करू नये म्हणून शहर भाजपाने आपल्या सर्वच नगरसेवकांचे राजीनामे लिहून घेतले आहेत.

Nagpur corporator's resignation taken by BJP! | नागपुरात भाजपाने घेतले नगरसेवकांचे राजीनामे !

नागपुरात भाजपाने घेतले नगरसेवकांचे राजीनामे !

Next
ठळक मुद्देनगरसेवकांत खदखद : अनेकांनी व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासदार, आमदारांच्या विरोधी पवित्र्यानंतर आता नगरसेवकांनीही पक्षाशी प्रसंगी बंडखोरी करू नये, त्यांच्यावर वचक राहावा व पक्षाच्या चौकटीबाहेर कुठलेही वर्तन करू नये म्हणून शहर भाजपाने आपल्या सर्वच नगरसेवकांचे राजीनामे लिहून घेतले आहेत. नगरसेवक एकीकडे वर्षपूर्तीचा आनंद साजरा करण्याच्या नियोजनात असताना दुसरीकडे घेण्यात आलेल्या राजीनाम्यांमुळे त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. बहुतांश नगरसेवकांनी पक्षाच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, कारवाईच्या भीतीपोटी कुणीही उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.
महापालिका निवडणुकीत भाजपला विक्रमी यश मिळाले. तब्बल १०८ नगरसेवक निवडून आले तसेच चार नामनिर्देशित नगरसेवक आहेत. यात मोठ्याप्रमाणात प्रथमच निवडून आलेल्यांचाही समावेश आहे. गेल्या ११ महिन्याच्या कारभारात असे दिसून आले की, बरेच नगरसेवक पक्षाच्या आदेशाला न जुमानता महापालिकेच्या कारभारावर टीका करतात. सभागृहातही अडचणीचे प्रश्न उपस्थित करून सत्तापक्षाची कोंडी करतात. काही नगरसेवक तर पक्षाने दिलेल्या सूचनांचेही पालन करीत नाही. अशाप्रकारांना आळा बसावा तसेच नगरसेवकांवर वचक निर्माण व्हावा, या हेतूने भाजपाने आपल्या नगरसेवकांचे राजीनामे घेतले आहेत. पक्षाच्या या निर्णयामुळे भाजपा नगरसेवकांत खदखद निर्माण झाली आहे.
निवडणुकीला अजून वर्षही झालेले नाही. परंतु पक्षशिस्तीच्या नावाखाली राजीनामे घेतल्याने आपल्या पक्षाच्या नगरसेवकांवर विश्वास नाही का. असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे.पक्षाने राजीनामे घेऊन आपल्यावर अप्रत्यक्षपणे अविश्वास दाखविला, अशा भावना काही नगरसेवकांनी नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या. राजीनामे घेताना ज्येष्ठांचाही विचार केला नाही, अशी नाराजी काही ज्येष्ठ सदस्यांनी व्यक्त केली. राजीनामे घेतल्याने पक्षात लोकशाही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संघटना आणि पक्ष यात फरक असतो. एकाधिकारशाहीमुळे कोणताही पक्ष फारकाळ टिकू शकत नाही. यानिर्णयामुळे पक्षाचेच नुक सान होईल, अशी महापालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारखे प्रभावी नेते शहरात असतानाही पक्षाच्या नगरसेवकांचे राजीनामे घेऊन ठेवण्याची वेळ भाजपावर का आली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर,नगरसेवकांचे राजीनामे घेऊन सुरक्षित सत्तापक्ष नेत्याकडे ठेवण्यात येतात. यामुळे पक्षाची विचारधारा तोडली किंवा पक्षविरोधी कार्य केल्यास, त्या नगरसेवकावर कारवाई करणे सोपे जात असल्याचे भाजप नेते सांगतात.
राजीनामे घेण्याची भाजपात पद्धत
 पक्षावर निष्ठा असावी, त्याचे व्यवहार चांगले असावे. पक्षशिस्त टिकावी आणि पक्षाला नुकसान होईल, असे कृत्य कुठल्या नगरसेवकाने केल्यास त्याच्यावर कारवाई करता यावी, यासाठी नागपूर भाजपात पक्षाच्या नगरसेवकांचे राजीनामे घेण्याची पद्धत आहे. पहिल्यांदाच नगरसेवकांचे राजीनामे घेतलेले नाही. नागपुरात भाजपची ३० वर्षांची परंपरा आहे. यावेळी एक वर्ष पूर्ण होत आल्यावर राजीनामे घेण्यात आले एवढेच.
- आ. गिरीश व्यास, प्रदेश प्रवक्ते, भाजपा

Web Title: Nagpur corporator's resignation taken by BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.