नागपूरकर दाम्पत्याचे सातासमुद्रापार ‘याेग’ धडे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:07+5:302021-06-21T04:07:07+5:30

नागपूर : महालच्या नवी शुक्रवारी भागात राहणारे भारत गुप्ता व पत्नी सराेज गुप्ता असेच एकदा ऑस्ट्रेलियाला राहणाऱ्या मुलाकडे गेले. ...

Nagpur couple's 'Yag' lessons overseas () | नागपूरकर दाम्पत्याचे सातासमुद्रापार ‘याेग’ धडे ()

नागपूरकर दाम्पत्याचे सातासमुद्रापार ‘याेग’ धडे ()

Next

नागपूर : महालच्या नवी शुक्रवारी भागात राहणारे भारत गुप्ता व पत्नी सराेज गुप्ता असेच एकदा ऑस्ट्रेलियाला राहणाऱ्या मुलाकडे गेले. स्वस्थ बसण्याची सवय नसलेल्या भारत यांनी तिथे नि:शुल्क याेग प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले. पत्नीही साेबत हाेती. पाहता पाहता असंख्य ऑस्ट्रेलियन त्यांच्या वर्गात सामील झाले. अनेक संस्था याेग प्रशिक्षणासाठी त्यांच्याशी जुळल्या. यानंतर या दाेघांची स्वारी अमेरिकेच्या डेट्राईट येथे राहणाऱ्या लहान मुलाकडे वळली. तिथेही ताेच पायंडा या दाम्पत्याने पाडला आणि अल्पावधीत ‘याेगाचार्य’ म्हणून लाेकप्रिय झाले. २००९ पासून सुरू झालेला नागपूरकर दाम्पत्याचा हा ग्लाेबल प्रवास थक्क करणारा ठरला.

डाॅ. भारत गुप्ता हे जुलै २००९ मध्ये स्टील ऑथाॅरिटी ऑफ इंडिया (सेल), चंद्रपूर येथून असि. जनरल मॅनेजर या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर एक तप पूर्ण केल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती निश्चिंत आयुष्य घालविणे पसंत करते. पण भारत गुप्ता निश्चिंत बसणारे नव्हते. २००५ साली हरिद्वार येथून बाबा रामदेव यांच्याकडून दाम्पत्याने याेगाचे प्रशिक्षण घेतले हाेते. घेतलेले ज्ञान इतरांनाही देण्याची त्यांची इच्छा हाेती व निवृत्तीनंतर त्यांना ही संधी मिळाली. सप्टेंबर २००९ मध्ये ते माेठ्या मुलाकडे ऑस्ट्रेलियाच्या डार्विन शहरात गेले आणि मुलाच्या ओळखीच्या लाेकांना याेग प्रशिक्षण देणे सुरू केले. त्यांच्या कार्यामुळे नार्दर्न टेरिटरीचे मुख्यमंत्री ॲन्डरसन यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे कार्य मेलबर्न ते सिडनीपर्यंत पसरले.

यानंतर ते अमेरिकेत गेले. तेथेही त्यांनी आपले कार्य पुढे चालविले. अल्पावधीत याेगा फाॅर पीस, याेग असाेसिएशन ऑफ ग्रेटर डेट्राईट, कर्मयाेगा, ग्रेस याेगा स्टुडिओ, नेस्ट सिनियर सिटीझन सेंटर आदी संस्थांनी गुप्ता दाम्पत्याला प्रशिक्षणासाठी पाचारण केले. येथे याेग असाेसिएशनने त्यांना याेगाचार्य ही पदवी बहाल करीत याेगी सत्यानंद असे नामकरण दिले. यादरम्यान काही काळासाठी माेठा मुलगा न्यूझीलंडला गेला असता, त्या ठिकाणीही या दाम्पत्याने आपल्या कार्याने सर्वांना प्रभावित केले. साऊथ आयलॅंडच्या मेयरकडून गुप्ता दाम्पत्याला सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याच्या प्रभावामुळे इंग्लंडच्या संस्थेनेही त्यांना विशेषत्वाने पाचारण करून प्रशिक्षण घेतले.

२० च्यावर संस्थांना ऑनलाईन मार्गदर्शन

गेल्या १० वर्षापासून गुप्ता दाम्पत्याचे विविध देशात याेग प्रशिक्षणाचे कार्य सुरू आहे. असंख्य संस्था त्यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहेत. काेराेना काळात सर्व स्तब्ध असताना त्यांचे कार्य सुरू आहे. भारत व नेपाळसह विविध देशातील २० च्यावर संस्थांना हे दाम्पत्या मार्गदर्शन करीत आहे. मात्र कुणाकडून एक रुपयाही त्यांनी कधी घेतला नाही. याेगासाठी भारत हा जगाचा गुरू आहे आणि गुरूपदाला शाेभेल असे ग्लाेबल कार्य भारत व सराेज गुप्ता यांनी चालविले आहे. परदेशी लाेक काही महिने भारतात राहून याेग शिकतात व आपल्या देशात जाऊन रग्गड पैसा कमवितात पण भारत गुरू आहे व त्यानुसार नि:शुल्क विद्यादान करणे हे आपले कर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अमेरिकन विद्यापीठातून पीएचडी

गुप्ता दाम्पत्याने कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठातून याेगामध्ये मास्टर डिग्री केली आणि सध्या फ्लाेरीडा, युएसए येथील याेग संस्कृतम विद्यापीठातून पीएचडी करीत आहेत. या काळात अनेक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही ते याेगाचे प्रशिक्षण देत आहेत.

Web Title: Nagpur couple's 'Yag' lessons overseas ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.