गतवर्षीच्या वादातून बादलचा बदला; तरुणाची चाकूने हत्या
By योगेश पांडे | Published: June 9, 2024 06:21 PM2024-06-09T18:21:28+5:302024-06-09T18:22:07+5:30
या घटनेत दोन अल्पवयीन मुलांनीदेखील आरोपीची मदत केली.
नागपूर : नागपुरात परत एकदा हत्यांचे सत्र सुरू झाले असून, सलग दुसऱ्या दिवशी शहरात हत्येची घटना नोंदविण्यात आली आहे. मागील वर्षी झालेल्या वादाचा बदला काढण्यासाठी आरोपीने एका तरुणाची हत्या केली. आश्चर्याची बाब म्हणजे हत्येच्या या घटनेत दोन अल्पवयीन मुलांनीदेखील आरोपीची मदत केली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
बादल भाऊराव निंबर्ते (२४, भीमनगर), असे मृताचे नाव आहे. त्याचा मागच्या वर्षी राज अनिल पाटील (१९, भीमनगर) याच्यासोबत वाद झाला होता. तेव्हापासून राज बादलचा बदला घेण्याचा विचार करत होता. ८ जूनरोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास राजने बादलला फोन करून सावित्रीबाई फुले अंगणवाडीसमोर भेटायला बोलविले. तेथे बादल पोहोचला असता राजने जुना वाद उकरून काढला. त्याने त्याला शिवीगाळ केली. बादलने त्याला असे करण्यापासून रोखले असता राजने त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांसोबत बादलला मारहाण सुरू केली. त्याने अचानक बादलवर चाकूने वार केले तसेच लोखंडी रॉडने वार करत त्याला रक्तबंबाळ केले. त्यानंतर बादलला जखमी अवस्थेत सोडून आरोपी फरार झाले. याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. बादलला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचे वडील भाऊराव यांच्या तक्रारीवरून राजविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी राजला रात्रीच हुडकून अटक केली. तर त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.