नागपुरात साक्षीदारावर गुंडाचा प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 07:38 PM2018-09-25T19:38:09+5:302018-09-25T19:39:26+5:30
कोर्टात साक्ष दिली म्हणून एका कुख्यात गुन्हेगाराने आपल्या भावाच्या मदतीने साक्षीदारावर प्राणघातक हल्ला चढवून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी मध्यरात्रीनंतर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोर्टात साक्ष दिली म्हणून एका कुख्यात गुन्हेगाराने आपल्या भावाच्या मदतीने साक्षीदारावर प्राणघातक हल्ला चढवून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी मध्यरात्रीनंतर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. राजा पठाण (वय ३५) आणि त्याचा भाऊ शकिल पठाण (वय ३६) अशी आरोपींची नावे आहेत. ते मंगळवारी गोवा कॉलनीत उड्डाण पुलाखाली राहतात.
राजेश वर्मा (वय ३४) हा हॉटेलमध्ये काम करतो. तो सदरमध्ये राहतो. आरोपी राजा पठाण हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध मोक्काची कारवाई झाली आहे. एका गुन्ह्यात वर्माने राजा पठाणच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली. त्यामुळे तो वर्माचा राग धरून होता. त्यावेळी त्याने वर्माला धडा शिकविण्याची धमकीही दिली होती. नेहमीप्रमाणे वर्मा दाम्पत्य सोमवारी रात्री जेवण केल्यानंतर झोपी गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी राजा आणि शकील रॉड तसेच शस्त्र घेऊन वर्माच्या घरी पोहचले. त्यांनी दारावर लाथा मारून वर्मा दाम्पत्याला दार उघडण्यास बाध्य केले. दार उघडताच आरोपींनी वर्माला तू कोर्टात साक्ष का दिली, अशी विचारणा करून शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या डोळ्यात मिरची पावडर झोकून डोक्यावर जोरदार फटके हाणले. रक्ताच्या थारोळ्यात लोळलेल्या पतीची मदत करण्यासाठी सोनू वर्मा (वय ३२) धावली असता आरोपींनी तिलाही शिवीगाळ करून धमकी दिली. वर्मा दाम्पत्याची आरडाओरड ऐकून शेजारी गोळा झाले. ते पाहून आरोपी पळून गेले. जखमी वर्माला मेयोत दाखल करण्यात आले. माहिती कळताच सदर पोलीस घटनास्थळी पोहचले. तेथून ते रुग्णालयात गेले. सोनू वर्माच्या तक्रारीवरून आरोपी राजा आणि शकिल पठाणविरुद्ध कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी धावपळ करून आरोपी शकिलला अटक केली. राजा पठाणचा शोध घेतला जात आहे.