नागपूर सीमाशुल्क विभागाने जाळला ७२७ किलो गांजा
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 10, 2024 04:41 PM2024-04-10T16:41:54+5:302024-04-10T16:42:56+5:30
- दोन प्रकरणात डीआरआयने केला होता जप्त.
मोरेश्वर मानापुरे, नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), नागपूर प्रादेशिक युनिटने दोन प्रकरणांमध्ये जप्त केलेला ७२७.३९५ किलो गांजा नागपूर सीमाशुल्क विभाग आणि डीआरआयने बुटीबोरी येथील एमईपीएल कंपनीत जाळला. हरित पर्यावरणासाठी प्रदूषण नियंत्रण कायद्याचे पालन करीत गांजाची विल्हेवाट लावली.
सीमाशुल्क आयुक्त संजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ड्रग डिस्पोजल कमिटी व सीमाशुल्क नागपूरचे अध्यक्ष पीयूष भाटी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) उपायुक्त निखिल वडनम आणि सहाय्यक आयुक्त अंजुम तडवी यांच्या उपस्थितीत मंगळवारी गांजा जाळण्यात आला.
महसूल गुप्तचर संचालनालय, नागपूर प्रादेशिक युनिटने दोन एनडीपीएस प्रकरणांमध्ये २०८.७८० आणि ५१८.६१५ किलो गांजा जप्त केला होता. एनडीपीएस कायदा-१९८५ आणि नागपूर सीमाशुल्क आयुक्तालयाच्या विल्हेवाट नियमावली २०१९ नुसार गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.
केंद्र सरकारच्या ‘ड्रग फ्री इंडिया’ या संकल्पनेला अनुसरून आणि एनडीपीएस पदार्थांची तस्करी करणाऱ्या तस्करांना कडक संदेश देण्यासाठी विशेष प्रक्रियेंतर्गत गांजा नष्ट करण्यात आल्याचे सीमाशुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांनी म्हटले आहे.