नागपूर सायबर सेलने घातली दिल्लीतील कॉल सेंटरवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:29 AM2017-12-26T11:29:38+5:302017-12-26T11:31:28+5:30
प्रतापनगर ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या फसवणूक प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेच्या सायबर सेल आणि प्रतापनगर पोलिसांनी दिल्लीतील एका कॉल सेंटरवर धाड टाकली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : प्रतापनगर ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या फसवणूक प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेच्या सायबर सेल आणि प्रतापनगर पोलिसांनी दिल्लीतील एका कॉल सेंटरवर धाड टाकली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे. अटकेतील आरोपी फरिदाबाद येथील सूर्यप्रकाश ईश्वरनाथ तिवारी (२६) आहे. सूर्यप्रकाश कॉल सेंटरचा व्यवस्थापक आहे, तर कॉल सेंटर मालक पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
वर्धा मार्गावर राहणारे उल्हास आत्माराम नंदनकर (५३) यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी प्रकरण नोंदविले होते. नंदनकर शासकीय कार्यालयात अधिकारी आहेत. जवळपास एक महिन्यापूर्वी त्यांना एक फोन आला. फोन करणाऱ्याने तो ‘एक्सक्लुसिव्हआॅफर.कॉम’मधून बोलत असल्याचे त्यांना सांगितले. त्याने कंपनीतून आॅनलाईन शॉपिंग करून जोडे खरेदी केल्यास आय-१० कार लागण्याची बतावणी केली. नंदनकर यांना आॅफर आवडली आणि त्यांनी जोडे खरेदी केले. हे जोडे त्यांना मिळाले, मात्र येथून फसवणुकीचा खेळ सुरू झाला. विविध प्रकारचे उपकरण स्वस्त किमतीत देणे आणि जितकी अधिक शॉपिंग कराल बक्षीसमध्ये कार मिळण्याची संधी वाढेल, असे सांगून आरोपींनी त्यांना जाळ्यात अडकवले. त्यांना लकी-ड्रॉमध्ये आय-१० कार लागल्याचे सांगितले. यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने जवळपास सात लाख रुपये स्वत:च्या खात्यांमध्ये जमा करून घेतले.
त्यानंतर अनेकदा त्यांनी कंपनीच्या फोन क्रमांकावर संपर्क साधला, मात्र त्यांना उत्तर मिळाले नाही. नंदनकर यांनी प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. प्रतापनगर पोलिसांनी सायबर कम्प्लेंट सेलच्या मदतीने प्रकरणाची चौकशी सुरू केली. फोन क्रमांकाच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला. संयुक्त पथक दिल्लीला रवाना झाले. तेथे चौकशी केली असता, साऊथ ईस्ट दिल्लीच्या नेहरू प्लेसमध्ये कॉल सेंटर असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी दिल्लीतील कॉल सेंटरवर धाड टाकली असता सूर्यप्रकाश त्यांच्या हाती लागला.
आश्चर्य म्हणजे आॅनलाईन शॉपिंगची ही वेबसाईट आताही सुरू आहे. ही कारवाई डीसीपी श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर, पीएसआय डोर्लीकर, पोहवा संतोष ठाकूर, संतोष मदनकर, अमित भुरे, राहुल धोटे आणि विजय वडस्कर यांनी केली.
कारऐवजी पाठवले ३.५० लाख रुपयांचे सामान
नंदनकर यांचा विश्वास बसावा म्हणून आरोपी कधी लॅपटॉप तर कधी टीव्ही पाठवत राहिले. नंदनकर त्यांच्या आमिषाला बळी पडले. सांगितलेल्या वेळेत इलेक्ट्रॉनिक उपकरण मिळाल्याने त्यांचा विश्वास आरोपींवर वाढला. जवळपास ३.५० लाख रुपयांचे उपकरण आरोपींनी नंदनकर यांना पाठविले, मात्र त्यांना कार मिळाली नाही.
तीन दिवसांची पोलीस कोठडी
आरोपींनी लोकांना गंडा घालण्यासाठी पूर्ण कॉल सेंटरचा सेटअप तयार केला होता. येथे तरुणांना कामावर ठेवून लोकांना फोनवर विविध प्रकारचे आमिष दाखवून लुबाडण्यात येत होते. या कॉल सेंटरचा मालक फरार आहे. प्रतापनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सूर्यप्रकाशला न्यायालयात हजर करून तीन दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.