नागपुरात सायबर गुन्हेगाराचा पोलिसाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 01:01 AM2019-03-26T01:01:24+5:302019-03-26T01:03:02+5:30
चोरी-बनवाबनवी करणाऱ्यांच्या मुसक्या बांधण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसाला एका ठगबाजाने गंडा घातला. क्रेडिट कार्डची माहिती घेतल्यानंतर त्याला एक ओटीपी नंबर पाठवून सायबर गुन्हेगाराने पोलीस कर्मचाऱ्याचे २० हजार रुपये हडपले. गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीत २० मार्चला ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चोरी-बनवाबनवी करणाऱ्यांच्या मुसक्या बांधण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसाला एका ठगबाजाने गंडा घातला. क्रेडिट कार्डची माहिती घेतल्यानंतर त्याला एक ओटीपी नंबर पाठवून सायबर गुन्हेगाराने पोलीस कर्मचाऱ्याचे २० हजार रुपये हडपले. गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीत २० मार्चला ही घटना घडली.
गिट्टीखदानमधील कामगारनगर, पोलीस लाईन टाकळी येथे दीपक शालिकराम झाडे (वय ४५) राहतात. ते पोलीस कर्मचारी असून वाहन विभागात सेवारत आहेत. २० मार्च रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. पलीकडून बोलणाऱ्या आरोपीने बजाज फायनान्स कंपनीच्या क्रेडिट कार्डविषयी आधी माहिती घेतली. त्यानंतर झाडेंना एक ओटीपी नंबर आला. तो ओटीपी नंबर विचारून त्यांच्या नावावर फोन करणाऱ्या आरोपीने फ्लिपकार्ट कंपनीच्या माध्यमातून ३९ हजार ६९ रुपयांचा मोबाईल विकत घेतला. या मोबाईलची किस्त भरण्याच्या संबंधाने झाडे यांच्या नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या खात्यातून २० हजार रुपये कपात केले. ते लक्षात आल्यानंतर झाडे यांनी बजाज फायनान्स कंपनीत विचारपूस केली असता, त्यांच्या नावाने अज्ञात आरोपीने मोबाईल विकत घेऊन फसविल्याचे कळले. झाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी ठगबाजाविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्याचा शोध घेतला जात आहे.