नागपुरात सायबर गुन्हेगारांनी प्राध्यापकाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 08:00 PM2020-08-20T20:00:45+5:302020-08-20T20:03:54+5:30
डेबिट कार्ड सुरू करण्याचे आमिष देऊन सायबर गुन्हेगारांनी एका प्राध्यापकाच्या खात्यातून एक लाख रुपये उडविल्याची घटना घडली आहे. वंजारी नगर येथील रहिवासी डॉ. विजय कापसे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेबिट कार्ड सुरू करण्याचे आमिष देऊन सायबर गुन्हेगारांनी एका प्राध्यापकाच्या खात्यातून एक लाख रुपये उडविल्याची घटना घडली आहे. वंजारी नगर येथील रहिवासी डॉ. विजय कापसे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.
डॉ. कापसे यांना २५ मार्चला मोबाईल क्रमांक ८९२७४११६२२ वरून कॉल आला. त्याने मी स्टेट बँक ऑफ इंडिया मेडिकल शाखेतील व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगितले. आपले नाव त्याने संतोष श्रीवास्तव सांगितले. कोरोनामुळे आम्ही ग्राहकांशी मोबाईलवरून चर्चा करत असल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही सर्व ग्राहकांना डेबिट एटीएम कार्ड देत आहोत तुम्हालाही डेबिट किंवा एटीएम कार्ड मिळेल त्यासाठी तुम्हाला जुनी माहिती सांगावी लागेल. असे सांगून त्याने कापसे यांना मोबाईलवर एक लिंक पाठवली. ती लिंक दुसऱ्या मोबाईलवर पाठवण्यास सांगितली. लिंक पाठवल्यानंतर कापसे यांच्या मोबाईलवर ओटीपी आला. त्यांनी कापसे यांना सांगायला लावला. सायबर गुन्हेगारांनी कापसे यांना एक-दोन दिवसात नवीन डेबिट किंवा एटीएम कार्ड घरच्या पत्त्यावर येईल असे सांगितले. सायबर गुन्हेगारांनी मोबाईल बंद करताच कापसे यांना शंका आली. त्यांनी आपल्या खात्यात जमा असलेली रक्कम कुटुंबीयांच्या खात्यात पाठविली. त्यानंतर त्यांना आपल्या खात्यातून एक लाख रुपये काढून घेतल्याची माहिती मिळाली. त्वरित संपर्क साधल्यामुळे सायबर गुन्हेगार हे कापसे यांच्या खात्यातून मोठी रक्कम काढू शकले नाहीत. याबाबत कापसे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तपासानंतर अजनी पोलिसांनी अफरातफरीचा गुन्हा दाखल केला.