नागपुरात सायबर ठगबाजांनी पोलीस शिपायालच गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 08:59 PM2020-05-20T20:59:37+5:302020-05-20T21:05:17+5:30
क्रेडिट कार्ड अॅक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने शहर पोलीस ठाण्यातील शिपायालाच सायबर ठगबाजांनी ५० हजार रुपयांनी गंडविले. ही घटना गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रेडिट कार्ड अॅक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने शहर पोलीस ठाण्यातील शिपायालाच सायबर ठगबाजांनी ५० हजार रुपयांनी गंडविले. ही घटना गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडली.
सुरेंद्र हरीणखेडे हे शहर पोलीस विभागात वाहनचालक असून पोलीस लाईन क्वॉर्टर येथे राहतात. ७ एप्रिलला ही घटना घडली. सुरेंद्र यांनी अॅक्सिस बँकेचे नवे क्रेडिट कार्ड घेतले होते. त्यांना ७ एप्रिलला ९१६९०१५२६८३६ या मोबाईल क्रमांकाकरून एक कॉल आला. पलिकडून बोलणाऱ्याने आपण अॅक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगून संभाषणाला सुरुवात केली. सुरेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलवर चर्चा केल्यानंतर ते अंघोळीला गेले. या दरम्यान आरोपीने पुन्हा दुसऱ्यांदा कॉॅल केला. यावेळी सुरेंद्र यांच्या पत्नीने कॉल रिसिव्ह केला. आरोपीने सुरेंद्रच्या मोबाईलवर ओटीपी क्रमांक पाठविला होता. तो त्यांच्या पत्नीने सांगून दिला. या आधारावर सुरेंद्र यांच्या क्रेडिट कार्डवरून ५० हजार ४०० रुपये उडविले. या प्रकरणी सुरेंद्र यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी धोकेबाजी आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.