नागपूर - कामठी मार्गावरील वेलकममध्ये डान्स बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:01 AM2018-03-31T00:01:17+5:302018-03-31T00:01:30+5:30
कामठी मार्गावरील वेलकम बारमध्ये गुरुवारी उशिरा रात्री परिमंडळ पाचच्या उपायुक्तांच्या पथकाने छापा घालून डान्सबार उजेडात आणला. येथे चार बार डान्सर्स अर्धनग्न अवस्थेत डान्स करीत होत्या तर, ११ ग्राहक त्यांच्यावर नोटा उधळत होते. पोलिसांनी व्यवस्थापकासह १२ जणांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी मार्गावरील वेलकम बारमध्ये गुरुवारी उशिरा रात्री परिमंडळ पाचच्या उपायुक्तांच्या पथकाने छापा घालून डान्सबार उजेडात आणला. येथे चार बार डान्सर्स अर्धनग्न अवस्थेत डान्स करीत होत्या तर, ११ ग्राहक त्यांच्यावर नोटा उधळत होते. पोलिसांनी व्यवस्थापकासह १२ जणांना अटक केली. विशेष म्हणजे, या डान्सबारमध्ये केवळ नागपूर नव्हे तर गुजरात आणि छत्तीसगडमधील आंबटशौकिन ग्राहकही पोलिसांना सापडले.
कामठीचा वेलकम बार वादग्रस्त प्रकारामुळे नेहमीच चर्चेत असतो. यापूर्वीही येथे डान्सबारवर छापे पडले असले तरी पोलिसांनी लेनदेनचा व्यवहार करून कारवाईवर मूठमाती घातली आहे. गुरुवारी तेथे पुन्हा छमछम सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी मध्यरात्री तेथे छापा घालण्यासाठी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना पाठविले. पोलिसांनी तेथे छापा घातला यावेळी आॅकेस्ट्राच्या मंचावर चार जणी तोकड्या कपड्यात आक्षेपार्ह वर्तन करीत नाचत होत्या. तर, दारूचे ग्लास हातात घेऊन आंबटशौकिन त्यांच्यावर नोटा उधळत होते. पोलिसांनी तेथून भूपेंद्र किशोरसिग चंदेल (वय ४०, रा. सुयोगनगर), प्रशांत सूर्यभान वंजारी (वय ३६, रा. कड़बी चौक, बेझनबाग), रितेश ब्रिजमोहन शर्मा (वय ५५, रा. सदर बाजार, रायपूर), सिद्धार्थ ब्रिजमोहन पुरोहित (वय ४०, रा. सूरत, गुजरात), राजेंद्र धनराज सातपुते (वय २८, रा. सदभावना नगर, नंदनवन) सचिन रामदास क्षीरसागर (वय ३४, रा. अयाचित मंदिराच्या मागे महाल) , राजू सुंदरलाल सोनसाखरे ( वय ३२,रा. श्री दर्शन कॉलोनी, नंदनवन), शेख दानिश शेख मिनहान (वय २६, रा. शिवशक्ति नगर), पंकज प्रल्हाद गोंडाणे (३८, रा.शेंडे नगर, टेका नाका), आसिफ खान (४२, रा. टिमकी), गुलाब रहांगडाले (वय ३२, रा. जयताळा) आणि विक्की ढोबळे (सोमलवाडा) यांना ताब्यात घेतले.