तरुणाईच्या ‘ब्रेन वॉश’साठी ‘डार्क वेब’चा वापर, साडेनऊ हजारांहून अधिक ‘यूआरएल’वर हंटर
By योगेश पांडे | Updated: December 19, 2024 23:38 IST2024-12-19T23:38:26+5:302024-12-19T23:38:40+5:30
Nagpur News: मागील काही काळापासून देशातील अंतर्गत सुरक्षेला हानी पोहोचवून कायदा व सुव्यवस्थेला धक्का लावण्यासाठी जहाल विचारसरणीच्या विविध संघटनांकडून प्रयत्न सुरू आहेत.

तरुणाईच्या ‘ब्रेन वॉश’साठी ‘डार्क वेब’चा वापर, साडेनऊ हजारांहून अधिक ‘यूआरएल’वर हंटर
- योगेश पांडे
नागपूर - मागील काही काळापासून देशातील अंतर्गत सुरक्षेला हानी पोहोचवून कायदा व सुव्यवस्थेला धक्का लावण्यासाठी जहाल विचारसरणीच्या विविध संघटनांकडून प्रयत्न सुरू आहेत. तरुणाईमध्ये जहाल विचारांचा प्रचार प्रसार करून त्यांचा ‘ब्रेन वॉश’ करण्यासाठी या संघटनांकडून तंत्रज्ञानासोबतच ‘डार्क वेब’चा वापर करण्यात येत असल्याचे सुरक्षायंत्रणांच्या चौकशीतून समोर आले आहे. ही बाब सुरक्षायंत्रणांसाठी धोक्याची घंटा असून अशा विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या साडेनऊ हजारांहून अधिक ‘यूआरएल’ला बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
देशातील व देशाबाहेरील विविध दहशतवादी तसेच कट्टरवादी संघटनांकडून जहाल विचार तरुणाईपर्यंत पोहोचवून त्यांना स्वत:कडे ओढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विविध घटनांमध्ये अटक झालेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतूनदेखील ही बाब स्पष्ट झाली आहे. तरुणांची दिशाभूल करत ऑनलाइन कंटेंट त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी त्यांच्याकडून इंटरनेटची सर्वसाधारण संकेतस्थळे, व्हॉट्सॲप, फेसबुक यांचा उपयोग तर होतच आहे. याशिवाय ‘डार्क वेब’चा वापर करण्यावर जास्त भर देण्यात येत आहे. यामुळे या संघटनांच्या गतिविधी सहजपणे सुरक्षायंत्रणांच्या रडारवर येत नाहीत. या संघटनांकडून समान विचारांच्या लोकांसोबत संवादासाठी ‘वायबर’, ‘सिग्नल’, ‘टेलिग्राम’चादेखील उपयोग करण्यात येत आहे. यासाठी बरेचदा ‘कोडेड’ भाषेचादेखील वापर होतो. सुरक्षायंत्रणांनी कट्टर व जहाल विचारांचा प्रचार प्रसार करत देशासाठी धोका निर्माण करणाऱ्या ९ हजार ८४५ ‘यूआरएल’ला ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
एनआयएकडून ६७ प्रकरणांची चौकशी
गृहविभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ऑनलाइन ‘रॅडिकलायझेशन’संदर्भात विविध राज्यांत शेकडो गुन्हे दाखल झाले आहेत. यातील ६७ प्रकरणांची ‘एनआयए’कडून चौकशी करण्यात येत आहे. एनआयएच्या पथकांनी आतापर्यंत ३२५ आरोपींना अटकदेखील केली आहे.
साडेसहाशेहून अधिक ऑनलाइन बेटिंग ॲपविरोधात कारवाई
काही संघटनांकडून ऑनलाइन बेटिंग-गेमिंग ॲप व संकेतस्थळांच्या माध्यमातून फंड रेझिंग करण्यात येत आहे. यातील अनेक मास्टरमाइंड्स हे बाहेरील देशात राहून सूत्रे संचालित करत आहेत. या ॲप्सच्या नादाला लागून भारतीयांना शेकडो कोटींचा फटका बसला असून यात तरुणांचे प्रमाण अधिक आहे. २०२२ ते २०२४ या कालावधीत अशा प्रकारच्या ६८२ ॲप्स व संकेतस्थळांना बंद करण्यात आले असून काही ॲप्सला बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.