नागपूरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला, दोघांनी चाकूने भोसकले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 02:27 PM2017-10-02T14:27:53+5:302017-10-02T14:28:16+5:30
चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी एका तरुणाला चाकूने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. रविवारी पहाटे दीड ते पावणेदोनच्या सुमारास पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
नागपूर - चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी एका तरुणाला चाकूने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. रविवारी पहाटे दीड ते पावणेदोनच्या सुमारास पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तुषार मौलीकर (वय १९) आणि जगदीश गोखले (वय १९) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही लाडपुरा, नंदागिरी मार्गावर राहतात.
दिगांबर उर्फ विक्की पराते (वय २२, रा. तांडापेठ) तसेच ललित उर्फ मल्लू तुळशीराम निमजे (वय १९) या दोघांसोबत आरोपी मौलीकर आणि गोखले चार दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यामुळे चौघांनी एकमेकांना मारहाणही केली होती. त्यावेळी विक्कीने आरोपींच्या कानशिलात लगावल्या होत्या. त्याचा वचपा काढण्यासाठी आरोपी चार दिवसांपासून संधी शोधत होते. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर विक्की आरोपींच्या घराजवळून जात होता. त्याला एका गल्लीत गाठून आरोपी गोखलेने त्याला मागून पकडले आणि मौलीकरने विक्कीच्या छातीवर, पोटावर, मांडीवर चाकूचे सपासप घाव मारून त्याला गंभीर जखमी केले. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यामुळे आरोपी पळून गेले. गंभीर अवस्थेतील विक्कीला मेयोत दाखल करण्यात आले. ही माहिती कळताच पाचपावलीचा पोलीस ताफा घटनास्थळी धावला. शनिवारी या प्रकरणी निमजेच्या तक्रारीवरून एएसआय अशोक पुंड यांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी गोखलेला अटक करण्यात आली. मौलीकरचा शोध घेतला जात आहे.
परिसरात तणाव
अवघे १९ वर्षे वय असलेल्या आरोपींनी क्षुल्लक हाणामारीच्या घटनेवरून विक्कीच्या हत्येचा कट रचून त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढविण्याच्या या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. जखमी विक्कीची प्रकृती गंभीर असून, फरार असलेल्या आरोपी मौलीकरचा पोलिसांसोबत काही तरुणही शोध घेत आहेत.