नागपुरात व्यापाऱ्याला पाच कोटींचा फटका : मुंबईतील तिघांची बनवाबनवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:12 PM2019-05-23T23:12:34+5:302019-05-23T23:13:19+5:30
नोकर म्हणून कंपनीचे कामकाज सांभाळायला ठेवलेल्या आरोपींनीच कंपनी बुडित काढण्याचा कट करून पाच कोटींचे नुकसान केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. याप्रकरणी कंपनी मालकाच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी मुंबईतील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोकर म्हणून कंपनीचे कामकाज सांभाळायला ठेवलेल्या आरोपींनीच कंपनी बुडित काढण्याचा कट करून पाच कोटींचे नुकसान केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. याप्रकरणी कंपनी मालकाच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी मुंबईतील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
गरोबा मैदान परिसरातील जगजीवनराम नगरातील रहिवासी अशोककुमार श्रीकिशन अग्रवाल (वय ४९) यांचा कळमन्यातील कापसी परिसरातील कंगवे आणि हेअर ब्रश तयार करण्याचा कारखाना आहे. त्यांनी मुंबई घाटकोपरला रामदेवनगर मार्गावर रिना कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय सुरू केले होते. तेथील कामकाज सांभाळण्यासाठी अग्रवाल यांनी दिना क्रिष्णा दास (वय ३५, रा. वाशी, मुंबई) आणि नीरव हिरालाल सिंघवी (रा. घाटकोपर) यांना नियुक्त केले होते. व्यवसायाच्या भरभराटीसाठी आणि प्रचार-प्रसारासाठी त्यांनी दिना दासच्या माध्यमातून मिलिंद फाय क्रिएटिव्ह सोल्युशन प्रा.लि. मुंबई नामक कंपनीला आपल्या कंपनीची वेबसाईट बनविण्याची जबाबदारी सोपविली. त्यासाठी त्यांनी १० लाख २८ हजार ९७७ रुपये उपरोक्त कंपनीला दिले.
दरम्यान, १ डिसेंबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान कंपनीच्या मालाला मागणी कमी झाली आणि व्यापाऱ्यांकडून येणे असलेली रक्कम थांबल्यामुळे अग्रवाल यांनी दासला विचारणा केली. यावेळी दास याने बाजारपेठेत मंदी असल्यामुळे असे होत असल्याचे सांगून वेळ मारून नेली. मात्र, हा प्रकार पुढेही सुरूच राहिल्यामुळे अग्रवाल यांनी बाजारपेठेत चौकशी केली असता, त्यांना धक्कादायक माहिती कळली. आरोपी दास आणि सिंघवी या दोघांनी संगनमत करून बीअर ब्युटी अॅसेसरीज प्रा. लि. नामक कंपनी सुरू केली. या कंपनीचे कामकाज त्यांनी अग्रवाल यांनी घेतलेल्या कार्यालयातून सुरू केल्याचेही त्यांना लक्षात आले. त्यांनी अग्रवाल यांच्या वेबसाईटचा व्यावसायिक वापर आपल्या कंपनीच्या नावाने सुरू केला. विशेष म्हणजे, अग्रवाल यांच्या कंपनीच्या वेबसाईटमध्ये आरोपी दास आणि सिंघवीने मिलिंद नामक आरोपीच्या माध्यमातून असे काही तांत्रिक बदल करून घेतले की अग्रवाल यांच्या कंपनीची वेबसाईट ओपन करताच आरोपींच्या कंपनीची वेबसाईट सुरू होत होती. यासंबंधाने अग्रवाल यांनी आरोपी दासला विचारणा केली असता, त्याने हा व्यवसाय माझा आहे, तुम्ही आता बाकी विसरून जा नाही तर तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, असे म्हटले.
अखेर गुन्हा दाखल
नोकर म्हणून कंपनीचे कामकाज सांभाळायला ठेवलेल्या आरोपींनीच कंपनी बुडित काढण्याचा कट करून पाच कोटींचे नुकसान केल्याचे उघड झाल्याने अग्रवाल यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदविली. लकडगंज पोलिसांनी या प्रकरणाची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर आरोपी दास, सिंघवी आणि वेबसाईट तयार करून देणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.