नागपुरात प्रेमप्रकरणातून स्वत:ला जाळून घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:34 AM2018-05-08T00:34:35+5:302018-05-08T00:34:52+5:30
लुटमारी करणाऱ्या तिघांनी विरोध केला म्हणून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची कळमना ठाण्यात नोंदविण्यात आलेली तक्रार बनावट निघाली. प्रेयसीसोबत वाद झाल्यामुळे पीडित तरुणाने स्वत:च स्वत:ला पेटवून घेतले आणि नंतर स्वत:ची आणि प्रेयसीची बदनामी होऊ नये म्हणून त्याने पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याचेही चौकशीत उघड झाले आहे. कळमना पोलिसांनी आज हा दावा केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लुटमारी करणाऱ्या तिघांनी विरोध केला म्हणून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची कळमना ठाण्यात नोंदविण्यात आलेली तक्रार बनावट निघाली. प्रेयसीसोबत वाद झाल्यामुळे पीडित तरुणाने स्वत:च स्वत:ला पेटवून घेतले आणि नंतर स्वत:ची आणि प्रेयसीची बदनामी होऊ नये म्हणून त्याने पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याचेही चौकशीत उघड झाले आहे. कळमना पोलिसांनी आज हा दावा केला आहे.
कामठी मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळून शनिवारी मध्यरात्री जात असताना एका आरोपीने रोखले. ‘तुम्हारे पास कितने पैसे है, असे त्याने विचारले. मेरे पास पैसे नही’, असे म्हटले असता आरोपीने आपल्या खिशात जबरदस्तीने हात घातला. तो रक्कम काढण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे आपण त्याचा प्रतिकार केला. यामुळे आमची हाणामारी झाली. ते पाहून आरोपींचे दोन साथीदार अंधारातून आले. त्यांनी अंगावर रॉकेल ओतून माचिसची जळती काडी फेकली. त्यामुळे गंभीररीत्या भाजलो, असे तक्रारवजा बयान इस्माईल अब्दुल मन्नान कुरेशी (वय २४) याने रविवारी कळमना पोलिसांना दिले होते. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाची चौकशी सुरू केली. इस्माईल यशोधरानगरातील एनआयटी क्वॉर्टरजवळ राहतो. सध्या ७० टक्के भाजल्यामुळे तो मेयोत मृत्यूशी झुंज देत आहे. त्याने सांगितलेला प्रकार अत्यंत गंभीर असल्याने पोलिसांनी आरोपींचा छडा लावण्यासाठी अनेकांसह इस्माईलशी संबंधित व्यक्तींनाही विचारपूस केली, तेव्हा भलतीच माहिती पुढे आली.
कळमना पोलिसांच्या माहितीनुसार, इस्माईल चिकन विक्रेता असून, त्याचे शांतिनगरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहे. त्यांचा शनिवारी वाद झाला. त्यातून इस्माईलने स्वत:ला पेटवून घेतले. ते पाहून त्याची प्रेयसी त्याला वाचविण्यासाठी धावली. त्यात तिचेही हात भाजले. तिनेच सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.