Nagpur: पगारवाढीच्या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने, ९ जुलै रोजी लाक्षणिक संपाचा इशारा
By आनंद डेकाटे | Published: July 5, 2024 07:04 PM2024-07-05T19:04:21+5:302024-07-05T19:04:41+5:30
Nagpur News: पगारवाढीच्या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांनी मोर्चा उघडला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता, अधिकारी कृती समितीच्या बॅनरखाली शुक्रवारी आयोजित द्वारसभेत तीनही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी निदर्शने केली.
- आनंद डेकाटे
नागपूर - पगारवाढीच्या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांनी मोर्चा उघडला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता, अधिकारी कृती समितीच्या बॅनरखाली शुक्रवारी आयोजित द्वारसभेत तीनही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी निदर्शने केली. यावेळी ९ जुलै रोजी लाक्षणिक संपाचा इशाराही देण्यात आला.
महावितरणच्या गड्डी गोदाम कार्यालयासमोर झालेल्या या द्वारसभा दरम्यान वक्त्यांनी सांगितले की, वेतनाबाबतच्या कराराची पाच वर्षांची मुदत ३१ मार्च २०२३ रोजी संपली आहे. कामगार संघटनांनी सुधारित प्रस्ताव तीन कंपन्यांचे व्यवस्थापन आणि ऊर्जा मंत्रालयाकडे सादर केला आहे. या संदर्भात एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. परंतु ४ जुलै रोजी मुख्य सचिवांच्या स्तरावर झालेल्या बैठकीत कोणताही ठोस पुढाकार घेता आला नाही. अशा स्थितीत ९ जुलै रोजी एकदिवसीय लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशनचे मोहन शर्मा यांनी केले. सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे विनय गोंधुळे, वीज कामगार महासंघाचे राजेश पोफळी, विद्युत क्षेत्रातील तांत्रिक कामगार संघटनेचे पांडुरंग कुकडे, मागासवर्गीय संघटनेचे सुशांत श्रृंगारे आदींनी संबोधित केले. सुभाष मुळे यांनी संचालन केले.