नागपूर जिल्ह्यात कपाशी पुन्हा संकटात : बोंडअळीनंतर आता कवडी रोगाचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 10:51 PM2018-01-04T22:51:28+5:302018-01-04T22:56:00+5:30
पावसाचा लहरीपणा, दमट आणि पिकाला हानीकारक अशा वातावरणामुळे भिवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी महागड्या कीटकनाशकाची फवारणी केली. परंतु त्याचाही काहीएक फायदा होऊ शकला नाही. यामुळे कपाशीच्या उत्पादनात कमालीची घट आली. त्यातच आता तीन वेचणीनंतर कपाशीची अखेरची वेचणी सुरू असताना कपाशी संकटात सापडली आहे. कपाशीवर लाल किटकांनी आक्रमण केले आहे
राम वाघमारे
आॅनलाईन लोकमत
नागपूर : पावसाचा लहरीपणा, दमट आणि पिकाला हानीकारक अशा वातावरणामुळे भिवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी महागड्या कीटकनाशकाची फवारणी केली. परंतु त्याचाही काहीएक फायदा होऊ शकला नाही. यामुळे कपाशीच्या उत्पादनात कमालीची घट आली. त्यातच आता तीन वेचणीनंतर कपाशीची अखेरची वेचणी सुरू असताना कपाशी संकटात सापडली आहे. कपाशीवर लाल किटकांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे कपाशीची वेचणी करण्यास मजूरही मागेपुढे पहात आहे. लाल किटकाद्वारे कपाशीवर ‘कवडी रोग’ उद्भवतो. त्यामुळे पुन्हा एकदा कापूस उत्पादक हवालदिल झाला आहे.
तालुक्यातील कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यासाठी शेतकऱ्यांनी महागड्या कीटकनाशकाची फवारणीही केली. मात्र त्याचा फायदा होऊ शकला नाही. बोंडअळीमुळे कपाशीच्या उत्पादनात प्रचंड घट आली. त्यातच आता कापसाला योग्य भाव नसल्याने कापूस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडला आहे. कापसाची वेचणी आता अंतिम टप्प्यात आहे. सर्वच शेतात पांढरे सोने दिसून येते. मात्र त्यावर आता कवडी रोगाचे आक्रमण झाले आहे. परिणामी कापसाच्या वेचणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहे.
बोंडअळीच्या हल्ल्यातून वाचलेल्या कपाशीच्या बोंडावर आता लाल पाखरांचे आच्छादन असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. कपाशीच्या प्रत्येक बोंडावर १० ते १५ पेक्षा अधिक संख्येने तसेच झाडावर आणि जमिनीवरही लाल पाखरांचे आच्छादन दिसून येते. नांद, पांजरेपार, भगवानपूर, चिखलापार, बेसूर आदी गावात ही स्थिती निदर्शनास येते. कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन पाहणी करावी, तसेच शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली जात आहे.
शेतातील बुरशी कारणीभूत
याबाबत कृषी विभागाशी संपर्क साधला असता या रोगाला कवडी रोग (एन्थेकनोज) असे संबोधत असल्याचे सांगण्यात आले. शेतातील बुरशी यासाठी कारणीभूत ठरते. हा रोग कोलेटोट्रिकम इंडीकम या कवचामुळे होतो. महाराष्ट्रात कापूस पिकविणाऱ्या सर्वच ठिकाणी हा रोग मोठ्या प्रमाणात आढळतो.
रोगाचे लक्षण
कपाशीवर हा रोग दोन अवस्थेत दिसून येतो. पहिल्या अवस्थेत रोपे मरतात. रोपांवर सुरुवातीला बिजलावर गोलाकार तांबूस ठिपके येतात. तसेच कोवळ्या देठावर जमिनीलगतच्या भागावर व्रण अथवा चट्टेरी खूण येऊन रोपे मरतात. रोपास येणाऱ्या दुसऱ्या पानावर व फांदीवर हा रोग आढळत नाही. हाच रोग दुसऱ्या अवस्थेत बोंडावर आढळतो. संपूर्ण बोंड या रोगाने व्यापले जाऊन आतील कापूस या बुरशीमुळे घट्ट चिकटून राहतो. तीच बुरशी खायला हे लाल रंगाचे कीटक येतात. यालाच कवडी रोग म्हणतात.
रोगावर उपाययोजना
या कवडी रोगाचे लक्षण दिसताच २५ ग्रॅम कॉपर आॅक्झिक्लोराईड किंवा २० ग्रॅम कार्बोन्डाझिम किंवा २० ग्रॅम मॅन्कोझेब व स्ट्रेप्ट्रोसायक्लीन २ ग्रॅम हे १० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. त्यामुळे हा रोग आटोक्यात येतो.
नुकसानीचे स्वरूप
या रोगामुळे कपाशीची रोगग्रस्त पाने कालांतराने सुकतात व शेवटी गळून पडतात. दमट व पावसाळी हवामानात या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. या रोगाची बुरशी पालापाचोळ्यावर असते. तसेच बुरशी पुढील हंगामातील पिकास रोग होण्यास कारणीभूत ठरते. कपाशी पिकावर हा रोग अतिवृष्टीच्या, थंड हवामानाच्या आणि विशेषत: ओलिताच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणत आढळतो. या रोगास दमट व किंचित उष्ण वातावरणही पोषक ठरते. रोगामुळे बोंडातील कापूस चिकटून राहत असल्याने उत्पादनावर व कपाशीच्या प्रतिवर विपरीत परिणाम होतो.