नागपूर जिल्ह्यात विधानसभेसाठी ४,३८२ मतदान केंद्र : अश्विन मुदगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 08:32 PM2019-09-14T20:32:09+5:302019-09-14T20:33:58+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४,३८२ मतदान केंद्र असणार आहेत. निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या संपूर्ण व्यवस्थेचा आढावा व्हिडीओ कान्फरन्सिग व्दारे निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी घेतला. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४,३८२ मतदान केंद्र असणार आहेत. मतदारांसाठी आयोगाच्या निर्देशानुसार केंद्रावर सर्व सुविधा देण्यात येणार आहेत.यामध्ये वैद्यकीय कीट, विद्युत पुरवठा, मतदारासाठी मदत केंद्र, मतदान केंद्राबाबत माहिती फलक, आदी सुविधा राहणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात मतदानासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
मतदानाची संपूर्ण प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्यासाठी २१ हजार ९७० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असून ४ हजार ९८२ कर्मचारी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पारदर्शक निवडणुकांसाठी व्हिडीओ सर्व्हिलन्स टीम,फ्लाईग स्क्वॉड आदीचे गठन करण्यात येणार आहे.
मतदार जागृती मोहीम
मतदारामध्ये जागृती निर्माण करण्यासोबत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बाबत माहिती देण्यासाठी ५६० मतदारजागृती क्लबची स्थापना करण्यासत आली आहे. या क्लबच्या माध्यतमातुन प्रत्येक गावांमध्ये जागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगीतले.
शहर तसेच जिल्ह्यात निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस विभागातर्फे आयोगाच्या निर्देशानानुसार आवश्यक सर्व उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.मागील लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे. निवडणूक विषयक नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ.भुषणकुमार उपाध्याय यांनी यावेळी सांगितले.
निवडणुकीसाठी अरूंधती पानतावणे ब्रॅण्ड अॅम्बेसडर
नवमतदारांमध्ये मतदानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेती बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे या नागपूर जिल्ह्यासाठी ब्रॅड अॅम्बेसडर असणार आहेत. दिव्यांग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी प्रा. विनोद आसुदानी जिल्ह्यासाठी आयकॉन्स राहणार आहेत.