नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार शिंदे गटात
By कमलेश वानखेडे | Published: July 22, 2022 04:55 PM2022-07-22T16:55:46+5:302022-07-22T17:33:41+5:30
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार हेदेखील अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत.
कमलेश वानखेडे
नागपूर : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार हे देखील अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. शुक्रवारी नागपूर विमानतळावर खा. कृपाल तुमाने यांच्या स्वागतासाठी इटकेलवार पोहचले. यावेळी त्यांनी आपण खा. कृपाल तुमाने व आ. आशीष जयस्वाल यांनी घेतलेल्या भूमिकेशी सहमत असल्याचे इटकेलवार यांनी स्पष्ट केले.
इटकेलवार हे ११ वर्षांपूर्वी शिवसेनेत आले होते. जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्याकडे रामटेक, कामठी, उमरेड या विधानसभाेचा कारभार होता. सोबतच त्यांची नागपूर सुधार प्रन्यासवर विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता शिंदे गटात गेल्यामुळे त्यांचे विश्वस्तपद कायम राहण्याची शक्यता आहे. आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपसण्यासाठी शिवसेनेत गेलो आहोत. येत्या काळात जिल्ह्यात आणखी विकासाचा झंझावात येईल. विकास निधी मिळेल, असा दावा त्यांनी 'लोकमत'शी बोलताना केला.
जाधव, कापसे यांना मुंबईला बोलावणे
माजी खासदार प्रकाश जाधव आणि उत्तम कापसे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईला बोलाविले आहे. शनिवारी दुपारी २ नंतर त्यांची भेट होणार आहे. जाधव संपर्क प्रमुख तर कापसे जिल्हा प्रमुख होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इटकेलवार यांना हटविण्यासाठी कापसे यांनी गतवर्षीपासून मोर्चा उघडला होता.