चारा साक्षरता अभियानात सहभागी व्हावे : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 11:47 PM2019-01-01T23:47:45+5:302019-01-01T23:48:18+5:30
जिल्ह्यातील सर्व शेतकरी पशुपालकांनी चारा साक्षरता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन जनावरांचे चारा व्यवस्थापन सुयोग्य समुचित माहिती प्राप्त करुन घ्यावी व त्याचा अवलंब करुन आपल्याकडील पशुधनाचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवून उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील सर्व शेतकरी पशुपालकांनी चारा साक्षरता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन जनावरांचे चारा व्यवस्थापन सुयोग्य समुचित माहिती प्राप्त करुन घ्यावी व त्याचा अवलंब करुन आपल्याकडील पशुधनाचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवून उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
पशुसंवर्धन विभागातर्फे दुष्काळी भागातील गोधन वाचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या चारा साक्षरता अभियानाला मंगळवारपासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याहस्ते ज्योत प्रज्वलित करून चारा अभियानाचा रथ गावागावात रवाना केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, जि.प.चे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुळकर, प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त डॉ. किशोर कुमरे, सहा. आयुक्त डॉ. मंगेश काळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रमोद सपाटे, डॉ. राजेंद्र रेवतकर, डॉ. मनोहर लाडुकर, डॉ. सुजित तापस, डॉ. मोहम्मद तालिब, डॉ. संजय मानकर, डॉ. अविरत सवईमुल, डॉ. मजहर इलाही, डॉ. विलास गावकरे, डॉ. राजेश ब्राह्मणकर, विनोद समर्थ आदी उपस्थित होते.
चारा अभियानांतर्गत जनजागृतीचे माध्यमातून जनावरांचे चारा व्यवस्थापन संबंधिचे तंत्रज्ञान जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा पशुसंवर्धन विभागाचा मानस असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी चारा साक्षरता अभियानाशी जोडले जातील, असा आशावाद जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी व्यक्त केला. हे अभियान १ ते १० जानेवारी दरम्यान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये चारा रथ फिरणार असून, गावकऱ्यांना चारा टिकविण्याचे प्रात्याक्षिक, चारा प्रक्रियेचे प्रात्याक्षिक, बहुवार्षिक चारा पिके, हिरव्या चाऱ्याचे महत्त्व, मुराघासमध्ये रूपांतर आदी माहिती देण्यात येणार आहे. यासाठी तीन तज्ज्ञांच्या टीम पशुसंवर्धन विभागाने तयार केल्या आहे.
महाराष्ट्र राज्य सध्या नजिकच्या काळात सर्वात जास्त चारा टंचाईस सामोरा जात आहे. महाराष्ट्र राज्यात सन २०१८ मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त १०८ तालुक्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर, काटोल व नरखेड या तीन तालुक्यांचाही समावेश आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत या तीन तालुक्यांमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर चारापिकांचे बियाणे व खते वाटप ही योजना राबविण्यात आली. त्यास शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
वैरण बियाणे वाटप योजनेचा लाभ घ्या
दुष्काळी परिस्थितीची दाहकता कमी करण्याच्या हेतूने पशुसंवर्धन विभागामार्फत जलाशय किंवा तलावाखालील गाळपेर जमिनीवर रबी व हिवाळी हंगामासाठी वैरण बियाणे लागवडीकरिता नाममात्र दरावर गाळपेर जमिनी उपलब्ध करण्यास्तव जिल्ह्याला दोन हजार हेक्टर लक्ष्य प्राप्त आहे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागामार्फत नियोजन व लाभार्थी निवड झालेली आहे. तसेच सदर योजनेत गाळपेर जमिनीव्यतिरिक्त ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांचेकडे २ हेक्टर क्षेत्राकरिता चारा पिकांची लागवड करण्यासाठी १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून या करीता तालुक्यातील पशुसंवर्धन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक यांनी केले आहे.