मायक्रोमॅक्स कंपनीला नागपूर जिल्हा ग्राहक मंचचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 09:08 PM2018-11-16T21:08:58+5:302018-11-16T21:13:11+5:30
ग्राहकास दर्जाहीन मोबाईल विकल्यामुळे मायक्रोमॅक्स इन्फ्रामॅटिक्स कंपनी, कंपनीचे धरमपेठ येथील विक्रेते मोबाईल डेन व धंतोली येथील सेवा केंद्र एल. रजा मायक्रोमॅक्स यांना दणका बसला. या तिघांनीही पीडित महिला ग्राहकास समान मॉडेलचा नवीन मोबाईल द्यावा किंवा मोबाईलची किंमत ६४०० रुपये १८ टक्के व्याजासह परत करावी असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला. तसेच, ग्राहकास पाच हजार रुपये भरपाईही मंजूर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्राहकास दर्जाहीन मोबाईल विकल्यामुळे मायक्रोमॅक्स इन्फ्रामॅटिक्स कंपनी, कंपनीचे धरमपेठ येथील विक्रेते मोबाईल डेन व धंतोली येथील सेवा केंद्र एल. रजा मायक्रोमॅक्स यांना दणका बसला. या तिघांनीही पीडित महिला ग्राहकास समान मॉडेलचा नवीन मोबाईल द्यावा किंवा मोबाईलची किंमत ६४०० रुपये १८ टक्के व्याजासह परत करावी असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला. तसेच, ग्राहकास पाच हजार रुपये भरपाईही मंजूर केली.
मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला. मोबाईलच्या किमतीवर २४ आॅक्टोबर २०१४ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले. ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता तीन हजार व तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार अशी एकूण पाच हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली.
सुनीता टोपरे असे तक्रारकर्तीचे नाव असून त्या रामदासपेठ येथील रहिवासी आहेत. २४ आॅक्टोबर २०१४ रोजी त्यांनी मोबाईल डेन यांच्याकडून ६४०० रुपयांत मायक्रोमॅक्स हॅन्डसेट खरेदी केला होता. हॅन्डसेटवर दोन वर्षांची वॉरन्टी असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर दोन महिन्यातच हॅन्डसेटमध्ये बिघाड आला. त्यामुळे त्यांनी १८ आॅगस्ट २०१५ रोजी एल. रजा मायक्रोमॅक्स यांच्याकडे हॅन्डसेट दुरुस्तीकरिता दिला. दुरुस्तीनंतर मोबाईल काही दिवस चांगला चालला. दुसऱ्यांदा बिघाड आल्यानंतर त्यांनी २३ आॅक्टोबर २०१५ रोजी हॅन्डसेट दुरुस्तीसाठी दिला. परंतु, सेवा केंद्राने हॅन्डसेट दुरुस्त करून देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे टोपरे यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम १२ अंतर्गत मंचमध्ये तक्रार दाखल केली. मंचने विविध बाबी लक्षात घेता त्यांनी तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.
अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब
तक्रारकर्तीने मोबाईल खरेदी केला, पण त्यांना त्याचा उपभोग घेता आला नाही. दोनवेळा मोबाईल दुरुस्त करुनही काही फायदा झाला नाही. त्यामुळे सेवा केंद्राने नवीन मोबाईल देण्याची ग्वाही दिली होती. परंतु, त्यानुसार तक्रारकर्तीला मोबाईल बदलवून देण्यात आला नाही. त्यावरून तिन्ही प्रतिवादींनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे व सेवेत त्रुटी ठेवल्याचे सिद्ध होते असे निरीक्षण मंचने हा निर्णय देताना नोेंदवले.