नागपूर जिल्ह्यात नियमित धान्यापासूनही शिधापत्रिकाधारक वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 11:50 AM2020-04-07T11:50:47+5:302020-04-07T11:51:21+5:30
रेशनकार्डधारकांनाच त्यांचे नियमित महिन्याचे धान्य देण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र शहर व जिल्ह्यात आहे. धान्य घेण्यासाठी आलेल्या कार्डधारकांना कुठे धान्याचा पुरवठा झालाच नाही, तर कुठे धान्य संपल्याचे उत्तर दिले जात आहे. तर पोर्टेबिलिटीची कारण पुढे येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेशनकार्डधारकांनाच त्यांचे नियमित महिन्याचे धान्य देण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र शहर व जिल्ह्यात आहे. धान्य घेण्यासाठी आलेल्या कार्डधारकांना कुठे धान्याचा पुरवठा झालाच नाही, तर कुठे धान्य संपल्याचे उत्तर दिले जात आहे. तर पोर्टेबिलिटीची कारण पुढे येत आहे.
सुरुवातीला शासनाने तीन महिन्यांचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आता सर्व रेशनकार्डधारकांना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ केंद्र शासनामार्फत मोफत देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र सध्या चालू महिन्याचे धान्य रेशन लाभार्थ्यांना दिले जात आहे. त्यातही अनेक लाभार्थ्यांना धान्य संपल्याचे उत्तर रेशन दुकानदारांकडून दिले जात आहे. विशेष म्हणजे चालान पास करताना लाभार्थ्यांची संख्या आणि एकूण धान्य यानुसार ती पास केली जातात. अशा वेळी संबंधित रेशन दुकानदारांकडे ग्राहक धान्य घेण्यास गेले नसतानाही ते संपते कसे? त्यांच्या हिश्श्याचे धान्य मग जाते कुठे? असा प्रश्न कार्डधारक उपस्थित करीत आहते. महालातील एका दुकानदाराने तर चक्क अद्याप धान्य पुरवठाच झाला नसल्याचे शिधापत्रिकाधारकांना सांगून त्यांना आल्यापावली परत पाठविले आहे. यंत्रणेकडून काही दुकानांची तपासणी करून कारवाई करण्याचे काम सुरू आहे. परंतु बहुतांश दुकानदारांकडे पोर्टेबिलिटीअंतर्गत इतर दुकानांच्या अंतर्गत येणाऱ्या कार्डधारकांनी धान्य नेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याच दुकानाच्या अंतर्गत येणाऱ्या परंतु पैशाअभावी किंवा इतर कारणास्तव धान्य नेण्यासाठी विलंबाने गेलेल्या कार्डधारकांना मात्र रिकाम्या हाती परतावे लागत आहे. याबाबत दुकानदारांकडून योग्य अशी उत्तरेही दिली जात नसल्याचे शहर व ग्रामीण भागातील अनेक दुकानात दिसत आहे.
जिल्ह्यात १ लाख २३ हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक
सदर योजनेचा लाभ जिल्ह्यातील १ लाख २३ हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना होणार आहे. यामध्ये शहरातील ४६ हजार तर ग्रामीण भागातील ७७ हजार शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. २ रुपये किलोने गहू तर ३ रुपये किलोने तांदूळसुद्धा उपलब्ध होईल. यासोबत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ किलो याप्रमाणे धान्य वितरित करण्यात येणार असून यामध्ये २ किलो गहू तर ३ किलो तांदळाचा समावेश आहे. याशिवाय प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे अन्नयोजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीस पाच किलो तांदूळ प्राप्त होणार आहेत.
शहरात रेशनकार्ड धारकांचा कार्ड नंबर पॉस मशीनमध्ये टाकून त्याला धान्य पुरवठा करण्यात येत आहे. सध्या एकाच महिन्याचे धान्य दिल्या जात आहे. त्यासोबतच प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ अतिरिक्तही देण्यात येत आहेत. जे दुकानदार धान्य देण्यास शिधापत्रिकाधारकांना टाळाटाळ करतील, त्यांची तक्रार करावी. त्यांच्यावर विभागाच्या वतीने योेग्य कारवाई करण्यात येईल.
अनिल सवई, अन्नधान्य वितरण अधिकारी शहर