नागपूर जिल्हा ग्रा.पं.निवडणूक; जि.प.ची ट्रायल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:57 AM2018-08-27T11:57:29+5:302018-08-27T11:57:59+5:30
गणेशोत्सवादरम्यान नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा राजकीय आखाडा रंगणार आहे. २६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतीत निवडणूक होईल. मात्र यंदाची ग्रा.पं. निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी ठरेल.
जितेंद्र ढवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशोत्सवादरम्यान नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा राजकीय आखाडा रंगणार आहे. २६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतीत निवडणूक होईल. मात्र यंदाची ग्रा.पं. निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी ठरेल. जिल्ह्याला जि.प. निवडणुकीची प्रतीक्षा आहे. मात्र सर्कलचा वाद कोर्टात अडकल्याने महापालिकेसोबत होणारी जि. प. निवडणूक लांबणीवर पडली. असे असले तरी भविष्यात होणाऱ्या जि. प. निवडणुकीवर सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेचा ग्रा.पं. निवडणुकीत निश्चितच कस लागणार आहे. यासोबतच जि.प.त. दमदार एन्ट्री करायची असल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गाव तिथे मेंबर असा विजयाचा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे.
२०१२ मध्ये जि.प.चे ५९ सर्कल होते. यात भाजपाचे २१, शिवसेनेचे ०८, काँग्रेसचे १९, राष्ट्रवादीचे ७, आरपीआय १, गोंडवाना गणतंत्र पार्टी १ आणि बसपाचा १ सदस्य निवडून आला होता. मध्यल्या काळात वाडीला नगर परिषदेचा दर्जा मिळाल्याने येथील जि.प.सदस्याचे सदस्यत्व आपोआप संपुष्टात आले. त्यामुळे भविष्यात जि.प.ची निवडणूक ५८ सर्कलसाठी होईल. सध्याच्या जि.प.सर्कलचा विचार केल्यास ग्रा. पं. निवडणूक जि.प.च्या बहुतांश सर्कलवर प्रभाव टाकणारी ठरेल.
जिल्ह्यात काटोल तालुक्यातील सर्वाधिक ५३ ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत आहे. येथे जि.प.चे चार सर्कल मोडतात. यात कोंढाळी या मोठ्या ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत असल्याने या संपूर्ण सर्कलवर या निवडणुकीचा प्रभाव पडेल. या चार सर्कलमध्ये सध्या राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचा एक आणि सेनेचा एक सदस्य जि.प.वर निवडून गेला आहे.
नरखेड तालुक्यात जि.प चे सध्या चार सर्कल असून येथे भाजपचे दोन, शिवसेना एक आणि राष्ट्रवादीचा एक सदस्य जि.प.वर निवडून गेला. या तालुक्यातील ३० ग्रा.पं.मध्ये निवडूणक होते. राजकीयदृष्ट्या भाजप आणि राष्ट्रवादीसाठी या सर्वच ग्रा.पं.महत्त्वाच्या आहेत.
कळमेश्वर तालुक्यातील २२ ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत आहे. येथे जि.प.चे तीन सर्कल मोडतात. दोन भाजपच्या आणि एक काँग्रेसच्या ताब्यात आहे. येथे विद्यमान काँग्रेसच्या आमदारांना आणि जि.प.सदस्याला ग्रा.पं.निवडणुकीत भाजपचे मोठे आव्हान असेल.
सावनेर तालुक्यात २७ ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत आहे. येथे जि.प.चे सर्वाधिक सहा सर्कल आहेत. यात बडेगाव, वाकोडी, केळवद, पाटणसावंगी, वलनी आणि चिचोली सर्कलचा समावेश आहे. या तालुक्यातील तीन जि.प.सर्कलवर भाजपाचा, दोन ठिकाणी काँग्रेसचा आणि एका ठिकाणी आरपीआयचा ताबा आहे. या तालुक्यात झालेल्या ग्रा.पं.निवडणुका नेहमीच जिल्ह्यात चर्चेत राहिल्या आहेत.
पारशिवनी तालुक्यातील १९ ग्रा.पं.मध्ये निवडणूक होऊ घातली आहे. येथे जि.प.चे पाच सर्कल आहेत. त्यात भाजपाकडे दोन, काँग्रेसकडे एक आणि शिवसेनेकडे एका सर्कलचा ताबा आहे.
रामटेक तालुक्यातील २९ ग्रा.पं. मध्ये निवडणूक होत आहे. जि.प.चे पाच सर्कल असलेल्या या तालुक्यात सेनेचा बोलबाला आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीचा एकमेव जि.प.सदस्य याच तालुक्यातील देवलापार सर्कल येथील आहे. जि.प.चे पाच सर्कल असलेल्या मौदा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीत निवडणूक होत आहे. यातील प्रत्येकी दोन सर्कल भाजप आणि शिवसेनाकडे आहे तर एका सर्कलवर काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात प्रभाव पाडणाºया कामठी तालुक्यातील केवळ ११ ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे या सर्कलमधील सदस्यांना भविष्यात होणाऱ्या जि.प.निवडणुका फारशा तापदायक ठरणार आहे. कामठी तालुक्यात जि.प.चे चार सर्कल मोडतात. यातील तीन सर्कल काँग्रेसच्या तर एक सर्कल भाजपाच्या ताब्यात आहे.
नागपूर ग्रामीण तालुक्यातील ३५ ग्रा.पं. मध्ये निवडणूक होत आहे. या तालुक्यात जि.प.चे सहा सर्कल मोडतात. पूर्वी येथे सर्कलची संख्या सात होती. वाडीला नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यानंतर येथील एक सर्कल कमी झाले. तालुक्यातील सहा सर्कलपैकी तीन सर्कल काँग्रेसकडे, दोन सर्कल भाजपकडे तर एका सर्कलवर राष्ट्रवादीचा उमेदवार जि.प.वर निवडून गेला आहे.
हिंगणा तालुक्यातील ४१ ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा गड असलेल्या या तालुक्यात जि.प.चे सहा सर्कल आहेत. यातील चार सर्कलवर भाजपचे आणि दोन सर्कलवर राष्ट्रवादीचे प्रभुत्व आहे. जि.प.चे तीन सर्कल असलेल्या उमरेड तालुक्यात २६ ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत आहे. या तालुक्यातील मकरधोकडा सर्कलवर बसपाचा एकमेव सदस्य जि.प.वर निवडून गेला आहे तर उर्वरित दोन सर्कलपैकी प्रत्येकी एक सदस्य भाजप आणि काँग्रेसचा आहे. बसपाने २०१४ च्या निवडणुकीत येथे काँग्रेसला धक्का देत दुसरा क्रमांकाची मते मिळविली होती. त्यामुळे ग्रा.पं.निवडणुकीत या तालुक्यात काट्याची लढत होईल.
कुही तालुक्यातील २२ ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत आहे. यात तालुक्यात जि.प.चे चार सर्कल मोडतात. त्यापैकी तीन सर्कल कॉँग्रेसच्या तर एक सर्कल भाजपाच्या ताब्यात आहे.
जि.प.चे तीन सर्कल असलेल्या भिवापूर तालुक्यात ३६ ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत आहे. यातील दोन सर्कल काँग्रेसच्या तर एक सर्कल भाजपाच्या ताब्यात आहे.
कोण मारणार बाजी?
राज्याच्या राजकारणाप्रमाणे नागपूर जि.प.मध्ये सध्या सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यामुळे येणारी जि.प.निवडणूक जि.प.अध्यक्ष निशा सावरकर आणि उपाध्यक्ष शरद डोणेकर यांची परीक्षा घेणारी ठरेल. ग्रा.पं.निवडणुकीत हे दोघे काय प्रभाव पाडतील, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र विखुरलेला विरोधी पक्ष आणि त्यांचे आरक्षित झालेले सर्कल यामुळे सत्ताधाऱ्यांना जि.प.निवडणुकीत अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी जिल्हात ग्रा.पं.चा कौल कुणाकडे जातो, यासाठी २७ सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.