नागपूर जि.प. आरोग्य विभागाच्या १०२ क्रमांकाच्या अॅम्ब्युलन्सचे वाहनचालक जाणार संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 09:19 PM2017-12-13T21:19:11+5:302017-12-13T21:19:30+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात १०२ क्रमांकावर आपत्कालीन सेवा देणारे वाहनचालक सोमवार १८ डिसेंबरपासून संपावर जाणार आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात १०२ क्रमांकावर आपत्कालीन सेवा देणारे वाहनचालक सोमवार १८ डिसेंबरपासून संपावर जाणार आहे. जि.प.च्या ४२ प्राथमिक आरोग्य केंद्रात ४२ वाहनचालक कार्यरत आहे. यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने, त्यांनी संप पुकारला आहे.
ग्रामीण भागात आरोग्याची सेवा देणारे हे वाहन चालक कंत्राटी कामगार आहे. जिल्हा परिषदेने नागपूर ग्रामीण युवक बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, तुमसर यांना वाहन चालक पुरविण्याचे कंत्राट दिले आहे. ग्रामीण भागातील ४२ प्राथमिक आरोग्य केंद्रात हे वाहनचालक २४ तास रुग्णसेवा पुरवित आहे. कंत्राटदाराने या वाहनचालकांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. त्यामुळे वाहनचालकांनी वेतनासाठी काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर वाहनचालकांचा आरोप आहे की, कंत्राटदार संस्थेकडून वाहनचालकांची अडवणूक करण्यात येते. कंत्राटदार संस्थेला प्रति वाहनचालक १५ हजार रुपये मिळतात. त्यातून वाहनचालकांना केवळ ७५०० रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून, नवीन कंत्राटी पद्धतीनेच पण जिल्हा परिषदेमार्फत वाहनचालकांना नियुक्ती द्यावी, अशी मागणी या वाहनचालकांनी केली आहे.