नागपूर : जिल्हा रुग्णालय अंतिम टप्प्यात, ३० सप्टेंबरपर्यंत संपतील कामे

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: June 17, 2024 03:31 PM2024-06-17T15:31:10+5:302024-06-17T15:32:47+5:30

 नागरिकांसाठी खुशखबर : जिल्हाधिकाऱ्यांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

Nagpur District Hospital in final stage works will be completed by September 30 | नागपूर : जिल्हा रुग्णालय अंतिम टप्प्यात, ३० सप्टेंबरपर्यंत संपतील कामे

नागपूर : जिल्हा रुग्णालय अंतिम टप्प्यात, ३० सप्टेंबरपर्यंत संपतील कामे

नागपूर : शहरातील बहुप्रतिक्षित जिल्हा रुग्णालय अंतिम टप्प्यात आहे. रुग्णालयाची उर्वरित कामे येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. त्याकरिता, राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला ९ कोटी ७२ लाख रुपये अदा केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे.

मानकापूर येथील शासकीय मनोरुग्णालयाच्या परिसरात पूर्णत्वास येत असलेले जिल्हा रुग्णालय तातडीने कार्यान्वित व्हावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते सत्यव्रत दत्ता व धरमदास बागडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. दरम्यान, न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आवश्यक आदेशांमुळे रुग्णालयाच्या कामांना गती मिळाली. आतापर्यंत रुग्णालयाची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. १७ जानेवारी २०१३ रोजी मंजूर हे रुग्णालय बांधण्यासाठी २ मे २०१८ रोजी एन. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला कार्यादेश दिला गेला. त्यानंतर हे काम १ मे २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, प्रशासकीय अडचणी व कोरोनामुळे रुग्णालय बांधण्यास विलंब झाला.

'लोकमत'ने वेधले होते लक्ष

'लोकमत'ने २७ नोव्हेंबर २०२३ रोजी बातमी प्रकाशित करून जिल्हा रुग्णालय कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. १०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयामध्ये ओपीडी, नेत्ररोग, ईसीजी, प्रयोगशाळा, फिजिओथेरपी, रक्तपेढी, एक्स-रे, स्त्रीरोग, प्रसूती, बालरोग, सोनोग्राफी, शस्त्रक्रिया, अतिदक्षता, दंतचिकित्सा इत्यादी वैद्यकीय सुविधा राहणार आहेत.

Web Title: Nagpur District Hospital in final stage works will be completed by September 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर