पूर्व विदर्भात डेंग्यूचा सर्वाधिक धोका नागपूर जिल्ह्याला; ऑगस्टपर्यंत ४८६ रुग्णांची नोंद
By सुमेध वाघमार | Updated: September 9, 2023 13:20 IST2023-09-09T13:18:31+5:302023-09-09T13:20:51+5:30
पूर्व विदर्भात ८४६ रुग्ण

पूर्व विदर्भात डेंग्यूचा सर्वाधिक धोका नागपूर जिल्ह्याला; ऑगस्टपर्यंत ४८६ रुग्णांची नोंद
नागपूर : एकीकडे विघ्नहर्त्याच्या आगमनाला घेऊन उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे. विशेषत: नागपूर जिल्हा ऐन सणासुदीच्या दिवसात तापाने फणफणला आहे. पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर जिल्ह्याला डेंग्यूचा अधिक धोका असल्याचे वाढत्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहे.
पाऊस, तापमान, आर्द्रता आणि अनियोजित शहरी विकासामुळे डासांची घनता वाढली आहे. ‘एडीस इजिप्ती’ प्रजातीच्या डासाच्या मादीद्वारे डेंग्यूचा संसर्ग पसरतो. हे डास चिकनगुनिया, पिवळा ताप आणि झिका विषाणूच्या संक्रमणास देखील कारणीभूत ठरतात. यामुळे वेळीच निदान गरजेचे असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२३पर्यंत ८४६ रुग्ण आढळून आले. यातील अर्ध्याहून अधिक म्हणजे ४८६ रुग्णांची नोंद एकट्या नागपूर जिल्ह्यात झाली.
- नागपूरनंतर गडचिरोली जिल्हा दुसरा क्रमांकावर
मागील आठ महिन्यात नागपूर शहरात ३२५ तर, ग्रामीणमध्ये १६० रुग्ण व एक मृत्यूची नोंद झाली. नागपूरनंतर डेंग्यू रुग्णसंख्येत गडचिरोली जिल्हा दुसरा क्रमांकावर आहे. या जिल्ह्यात १०८, चंद्रपूर जिल्ह्यात १०१, गोंदिया जिल्ह्यात ७९, वर्धा जिल्ह्यात ६२ तर सर्वात कमी १० रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात आहेत.