वाहन विक्रीत विदर्भात नागपूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:40 PM2019-10-31T22:40:58+5:302019-10-31T22:42:40+5:30
गेल्या काही महिन्यापासून मंदीत असलेल्या वाहन उद्योगात दसरा-दिवाळीत नवचैतन्य आले. ग्राहकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची उत्साहात खरेदी केली. आरटीओ कार्यालयात चारचाकींपेक्षा दुचाकींची चारपट नोंदणी झाल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही महिन्यापासून मंदीत असलेल्या वाहन उद्योगात दसरा-दिवाळीत नवचैतन्य आले. ग्राहकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची उत्साहात खरेदी केली. आरटीओ कार्यालयात चारचाकींपेक्षा दुचाकींची चारपट नोंदणी झाल्याची माहिती आहे. विदर्भात एकूण वाहन विक्रीपैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात ३७ टक्के वाहन विक्रीची नोंद वाहन सेवा संकेतस्थळावर झाली आहे.
यंदा वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त होती. विविध कंपन्यांनी राबविलेल्या आर्थिक बचतीच्या योजनांना ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. कमी व्याजदराच्या योजना ग्राहकांसाठी फायद्याच्या ठरल्या. अनेकांनी आधीपासून आवडत्या वाहनांची नोंद करून दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळी शुभमुहूर्तावर वाहन घरी नेले.
प्राप्त माहितीनुसार १ ते ३० ऑक्टोबर या काळात विदर्भातील ११ जिल्ह्यातील १३ आरटीओ कार्यालयांमध्ये सर्वच श्रेणीत एकूण २८,४३८ वाहनांच्या विक्रीची नोंद झाली. त्यातून शासनाला ८६ कोटी ५५ लाख ४८ हजार २११ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. विक्री झालेल्या वाहनांमध्ये २१ हजार ९३० दुचाकी, ४ हजार ३३७ चारचाकी आणि इतर वाहनांचा समावेश आहे. सर्वाधिक ४ हजार ३१२ वाहनांच्या विक्रीची नोंदणी पूर्व नागपूर उपप्रादेशिक कार्यालयात झाली. त्यामध्ये ३ हजार ३४० दुचाकी तर ५९९ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात ३ हजार ७९० आणि नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयात २ हजार ४३३ वाहनांच्या विक्रीची नोंद करण्यात आली. वाहन नोंदणी आणि विक्रीच्या माध्यमातून तिन्ही कार्यालयाला ४० कोटी १४ लाख ८० हजार २८४ रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिन्याच्या प्रारंभी वाहन विक्रीचा वेग कमी होता. नंतर वाढला. विविध कंपन्यांच्या वाहनांना नागरिकांकडून जास्त मागणी असल्याचे नोंदणीवरून दिसून येते. पुढे वाहन विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.
इरोज मोटर्सचे महाव्यवस्थापक सूरज भुसारी म्हणाले, यावर्षी दिवाळीत चारचाकी वाहनांना चांगला प्रतिसाद मिळाला. नागपुरात १५ कंपन्यांच्या डीलर्सच्या शोरुममधून महिन्याला जवळपास १७०० चारचाकींची विक्री होते. पण ऑक्टोबरमध्ये जवळपास ३ हजारांपेक्षा जास्त कारची विक्रीची माहिती आहे. ह्युंडईच्या तिन्ही शोरुममध्ये जवळपास ६०० गाड्यांची विक्री झाली असून तुलनात्मकरीत्या वाढ झाली आहे. माहितीनुसार, नागपुरात मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीत ५० टक्के वाटा आहे. दुचाकी गाड्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर होंडा आहे. त्यानंतर हिरो, बजाज आणि अन्य कंपन्यांच्या दुचाकी विक्रीचा समावेश आहे.