जूनमध्ये नागपूर जिल्ह्यात ११३ टक्के पाऊस; शेतकरी सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 08:14 PM2020-07-06T20:14:10+5:302020-07-06T20:14:37+5:30
जून महिन्यात अनेक वर्षानंतर विक्रमी पर्जन्यमान झाल्याचे बोलले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा मान्सूनचा पाऊस लवकर आणि चांगला बरसल्याने जून महिन्यात ११३.३ टक्के पावसाची नोंद झाली. जून महिन्यात अनेक वर्षानंतर विक्रमी पर्जन्यमान झाल्याचे बोलले जात आहे.
१ ते ३० जून दरम्यान सरासरी १६६.३ मिमी पाऊस पडतो. यंदा सरासरीच्या तुलनेत महिनाभरात १८८.४ मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजेच सरासरीच्या ११३.३ टक्के पाऊस जून महिन्यात झाला. गेल्यावर्षी जूनमध्ये केवळ ८२.७ मिमी म्हणजे ४९.७ टक्के इतकाच पाऊस झाला होता. गेल्यावर्षी झालेला समाधानकारक पाऊस आणि यंदाही जिल्ह्यात मान्सून लवकर सक्रिय झाल्याने भूजल पातळी वाढली आहे. यावर्षी जूनमध्ये जिल्ह्यात २१ दिवस पाऊस पडला. जुलै महिन्यात मुसळधार पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे धरण, तलाव, बंधारे, शेततळे, विहिरी, बोअरवेल रिचार्ज करून भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मान्सूनच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यात नागपूर जिल्ह्यात साधारणत: १००० मिमी सरासरी पाऊस अपेक्षित असतो. जूनमध्येच १८८.४ मिमी प्रत्यक्ष पाऊस पडला आहे. तर जुलैच्या आजच्या तारखेपर्यंत २०७ मिमी इतका पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये ४९.७ मिमी इतकाच पाऊस पडला होता.
- धरणांच्या जलसाठ्यातही वाढ
नागपूर शहर व ग्रामीण भागासाठी सर्वात महत्त्वाचा प्रकल्प तोतलाडोह आहे. तोतलाडोहची साठवण क्षमता १०१६.८८ दशलक्ष घन मीटर आहे. पण आजच्या स्थितीत तोतलाडोह येथे ७८७.८१ दलघमी म्हणजेच ७७.४६ टक्के पाणीसाठा आहे. आठवडाभरात धरणात १७.९६ दलघमी पाणीसाठा वाढलेला आहे. तर जिल्ह्यातील इतरही धरणांतील पाणीसाठा चांगलाच वाढत असल्याची माहिती आहे.