१७७ दिवसांनंतर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा उच्चांक, ४४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 12:50 PM2021-12-29T12:50:24+5:302021-12-29T13:03:20+5:30
नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ३,९८६ चाचण्या झाल्या. यातील शहरात झालेल्या २,८१० चाचण्यांमधून ३४ तर ग्रामीणमध्ये झालेल्या १,१७६ चाचण्यांमधून ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
नागपूर : कोरोनाच्या दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. १७७ दिवसांनंतर पहिल्यांदाच ४४ रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ४,९३,९०४ झाली. दिलासादायक बाब म्हणजे, ६२ दिवस होऊनही मृतांची संख्या १०,१२२ वर स्थिर आहे.
नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ३,९८६ चाचण्या झाल्या. यातील शहरात झालेल्या २,८१० चाचण्यांमधून ३४ तर ग्रामीणमध्ये झालेल्या १,१७६ चाचण्यांमधून ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. जिल्हाबाहेरील ७ रुग्णांनाही कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. शहरात आतापर्यंत रुग्णांची संख्या ३,४०,७०८ तर ग्रामीणमध्ये १,४६,२६३ झाली आहे. आज केवळ १ रुग्ण बरा झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९२ टक्क्यांवर आले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १५२ रुग्णांमधील शहरातील १२४, ग्रामीण व जिल्हाबाहेरील प्रत्येकी १४ रुग्ण आहेत.
-त्या युवतीचे नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठविणार
पूर्व आफिक्रेची प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या २७ वर्षीय युवतीचा आरटीपीसीआरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मनपाच्या आरोग्य विभागाने या युवतीला ‘एम्स’मध्ये दाखल केले आहे. बुधवारी तिचे नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठविले जाणार आहेत. सध्या एम्समध्ये विदेशातून आलेले १४ वर बाधित रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे.
- आमदार निवासात ३० रुग्ण
जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपलब्ध माहितीनुसार, मंगळवारी मेडिकलमध्ये ३, मेयोमध्ये १४ तर आमदार निवासात ३० रुग्ण भरती आहेत. उर्वरित रुग्ण खासगी हॉस्पिटलसह काही ग्रामीण भागातील संस्थात्मक विलगीकरणात उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे, भरती असलेला एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नसल्याची माहिती आहे.
-चार दिवसांत रुग्णांनी गाठली शंभरी
२५ डिसेंबर : २४ रुग्ण
२६ डिसेंबर : ३२ रुग्ण
२७ डिसेंबर : १२ रुग्ण
२८ डिसेंबर : ४४ रुग्ण
:: कोरोनाची मंगळवार स्थिती
दैनिक चाचण्या : ३,९८६
शहर : ३४ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ३ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण : ४,९३,९०४
ए. सक्रिय रुग्ण : १५२
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८३,६३०
ए. मृत्यू : १०,१२२