नागपूर जिल्ह्यात एसटीचा शैक्षणिक पास महागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 09:59 AM2018-06-12T09:59:27+5:302018-06-12T09:59:41+5:30
एसटी महामंडळाने १५ जूनपासून १८ टक्के भाडेवाढ करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे नागपूर जिल्ह्यातील तब्बल २५ हजार शाळकरी विद्यार्थ्यांना या भाडेवाढीचा फटका बसणार आहे.
दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी महामंडळाने १५ जूनपासून १८ टक्के भाडेवाढ करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे नागपूर जिल्ह्यातील तब्बल २५ हजार शाळकरी विद्यार्थ्यांना या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. दुसरीकडे यातील काही विद्यार्थी बिकट परिस्थितीमुळे एसटीचा पास काढू शकणार नसल्याने ते शिक्षणालाच मुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
डिझेलच्या दरवाढीचे कारण पुढे करत एसटी महामंडळाच्या वतीने प्रवासी भाड्यात १५ जूनपासून १८ टक्के दरवाढ करण्याचा निर्णय परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला आहे. या निर्णयाचा नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. नागपूर जिल्ह्यात गणेशपेठ, घाट रोड, इमामवाडा, वर्धमाननगर, सावनेर, काटोल, रामटेक, उमरेड या आठ डेपोतून महिन्याकाठी सरासरी २५ हजार ३८१ विद्यार्थी एसटीचा पास काढून शिक्षणासाठी ये-जा करतात. यात एसटी महामंडळ शाळेचा सही, शिक्का सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांना ६६.६६ टक्के सवलत देऊन त्यांच्याकडून फक्त ३३.३३ टक्के रक्कमच वसूल करते.
या सवलतीमुळे विद्यार्थ्यांना एसटीचा पास काढून प्रवास करणे परवडते. परंतु भाडेवाढीच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचा पास महागणार आहे. यातील काही विद्यार्थी नरखेडसारख्या सर्वाधिक आत्महत्या केलेल्या भागातील आहेत. आधीच परिस्थिती अभावी कसेबसे शिक्षण घेत असलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना या भाडेवाढीमुळे भुर्दंड बसणार असून त्यांच्यावर शिक्षणाला मुकण्याची पाळी येणार आहे. त्यामुळे महामंडळाने विद्यार्थ्यांना या भाडेवाढीतून वगळण्याची गरज आहे.
शिक्षण विभागाची सूट, एसटीची लूट
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शासनाकडून परीक्षा शुल्कात सूट देण्यात येते. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळतो. परंतु, आता एसटीने केलेल्या भाडेवाढीमुळे विद्यार्थ्यांच्या पासचे शुल्क वाढणार असून त्यांची मोठी लूट होणार आहे.