नागपूर जिल्हा डिजिटल होणार
By admin | Published: February 7, 2016 03:00 AM2016-02-07T03:00:05+5:302016-02-07T03:00:05+5:30
माहिती तंत्रज्ञानामुळे राज्यासह देशाचा विकास प्रचंड वेगाने होत आहे. त्याअंतर्गत २ आॅक्टोबर २०१६ ला नागपूर जिल्हा संपूर्णरीत्या डिजिटल होणार आहे.
मुख्यमंत्री यांची ‘कॉम्प-एक्स’ला भेट : देशातील पहिला जिल्हा ठरणार
नागपूर : माहिती तंत्रज्ञानामुळे राज्यासह देशाचा विकास प्रचंड वेगाने होत आहे. त्याअंतर्गत २ आॅक्टोबर २०१६ ला नागपूर जिल्हा संपूर्णरीत्या डिजिटल होणार आहे. तो देशातील पहिला जिल्हा ठरणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
विदर्भ कॉम्प्युटर अॅण्ड मीडिया डीलर्स वेलफेअर असोसिएशनच्या (व्हीसीएमडीडब्ल्यूए) कस्तुरचंद पार्कवर सुरू असलेल्या २४ व्या ‘कॉम्प-एक्स-२०१६’ प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सदिच्छा भेट दिली आणि प्रदर्शनाची पाहणी केली. या समारंभात ‘व्हीसीएमडीडब्ल्यूए’चे अध्यक्ष राजेश साबू, सचिव दिनेश नायडू, उपाध्यक्ष विनय धर्माधिकारी, एचपी एन्टरप्राईजेसचे विभागीय प्रमुख मोहित मंदोविया व एचपी इंकचे पश्चिम विभागीय व्यवस्थापक भरत ढाका उपस्थित होते. सध्या आयटी क्षेत्रात संशोधनाची नितांत गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.(वा. प्र.)
२५० सेवा आॅनलाईन होणार
ई-गव्हर्नन्सवर भर देताना मुख्यमंत्री म्हणाले, २ आॅक्टोबरला २५० सेवा आॅनलाईन होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स फॉर्मेटमधील या सेवांचा फायदा मोबाईल अॅपद्वारे मिळणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गाव माहिती तंत्रज्ञानाने जोडले जाईल आणि त्याचा फायदा शेतकरी व उत्पादकांना होणार आहे. या सर्व सेवा सुरू करताना ‘व्हीसीएमडीडब्ल्यूए’ची निश्चितच मदत होणार आहे. सध्या डिजिटल फॉर्मेटमध्ये १५० आॅनलाईन सेवा आहेत. त्यावर आतापर्यंत जवळपास ८ हजार इलेक्ट्रॉनिक्स अर्ज आले आहेत. त्यात ९९ टक्के पारदर्शक सेवा दिल्या आहेत. हे सर्व आयटीमुळे शक्य झाले आहे. एवढेच नव्हे तर राज्यातील १० स्मार्ट शहरांचा विकाससुद्धा आयटीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
प्रदर्शन अखेरचे दोन दिवस
पाच दिवसीय प्रदर्शन सोमवार, ८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. हे प्रदर्शन १० डोममध्ये भरविण्यात आले आहे. त्यात २४ पॅव्हेलियन आणि ६५ स्टॉल आहेत.