नागपूर जिल्ह्यात ग्रा.पं. निवडणुकीत काँग्रेसची घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 04:43 PM2018-09-27T16:43:08+5:302018-09-27T16:45:10+5:30
नागपूर जिह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत दमदार यश मिळवित कॉँग्रेस पक्षाने घरवापसी केली आहे. जिल्ह्यात काही तालुक्यातील प्रमुख ग्रा.पं.मध्ये भाजपने वर्चस्व कायम ठेवले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत दमदार यश मिळवित कॉँग्रेस पक्षाने घरवापसी केली आहे. जिल्ह्यात काही तालुक्यातील प्रमुख ग्रा.पं.मध्ये भाजपने वर्चस्व कायम ठेवले आहे. काटोल आणि नरखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी बहुतांश ग्रा.पं.वर विजय मिळविला आहे.
जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला १३ तालुक्यात सकाळी सुरुवात झाली.यात प्राथमिक कलानुसार जिल्ह्यात काँग्रेस समर्थीत पॅनेलच्या उमेदवारांनी बहुतांश ग्रा.प.च्या सरपंच आणि सदस्य पदाच्या निवडणुकीत विजय मिळविला आहे. नागपूर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जन्म गाव असलेल्या धापेवाडा येथे काँग्रेस समर्थित पॅनेलचे सुरेश डांगरे सरपंच पदी निवडुन आले.
धापेवाड्यात काँग्रेस समर्थित पॅनेलचे १६ तर भाजप समर्थित पॅनेलचा केवळ १ उमेदवार निवडून आला. यासोबतच खासदार दत्तक ग्राम योजनेअंतर्गत गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या उमरेड तालुक्यातील पाचगाव येथे काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उषा ठाकरे विजय झाल्या.
नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारी सरपंच आणि सदस्यपदासाठी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सरासरी ८०. २७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायत आणि रामटेक तालुक्यातील भिलेवाडा येथील सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम २३ आॅगस्ट रोजी जाहीर केला होता. निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर जिल्ह्यात सहा ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यासोबत दोन ग्रा.पं.मध्ये सरपंचपदाचे उमेदवार बिनविरोध नामित करण्यात आले.
त्यामुळे बुधवारी ३७४ ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठी मतदान घेण्यात आले होते. या ग्रा.प.च्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली. दुपारपर्यंत आलेल्या निकालात काँग्रेस जिल्ह्यात नंबर १ चा पक्ष ठरण्याची स्थिती आहे.
जिल्ह्यात उमरेड तालुक्यात हळदगाव ग्रा.पं. (काँग्रेस), परसोडी (भाजप), उटी (काँग्रेस), मांगली (भाजपा), सुरगाव (कॉँग्रेस-बसपा) बाजी मारली आहे. उमरेड तालुक्यात आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार काँग्रेस-भाजपा समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी प्रत्येकी ८ गावावर विजय मिळविला आहे तर गावामध्ये अपक्ष आणि एक गावात बसपा समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.
जिल्ह्यात काटोल तालुक्यातील कोंढाळी ग्रा.पं.मध्ये सरपंचपदी राष्ट्रवादी कॉँग्रेस समर्थित केशव धुर्वे यांचा विजयी झाले. नागपूर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी ग्रा.पं. आहे, हे विशेष. खानगाव येथेही राष्ट्रवादी समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी खाते उघडले.
सावनेर तालुक्यात २७ ही ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.
मौैदा तालुक्यात पावडदौना ग्रा.पं.वर भाजप समर्थित सतीश भोयर विजयी झाले. येथे नानादेवी ग्रा.प.च्या सरपंचपदी हरीदास श्रावण मारबते (सेना समर्थित), बोरगाव ग्रा.प.वर काँग्रेस समर्थित पॅनेलच्या स्वाती सुर्यकांत ढोबळे, दहेगाव ग्रा.पं.वर भाजप समर्थित पॅनेलचे बाळा आंबीलडुके सरपंचपदी विजयी झाले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदार संघ असलेल्या कामठी तालुक्यात ११ ग्रा.पं.पैकी ७ ग्रा.पं.वर काँग्रेस समर्थित तर ४ ग्रा.पं.वर भाजप समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे.